फेकरीतील जे.डी.सी.बँकेत चोरट्यांचा शिरकाव : सुदैवाने तिजोरी न फुटल्याने दोन लाख वाचले !
भुसावळ तालुका हद्दीत चोर्या वाढल्या : चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
Thieves break into JDC Bank in Fekri : Fortunately, two lakhs were saved as the safe did not burst! भुसावळ (3 जानेवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे भरवस्तीत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी खिडकीचे गज कापून प्रवेश केला मात्र सुदैवाने तिजोरी न फुटल्याने दोन लाखांची रोकड सुरक्षित राहिली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून भुसावळ तालुका पोलिसात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
तिजोरी न उघडल्याने रोकड वाचली
भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून शेतकर्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. शुक्रवार, 3 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजून 28 मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागच्या बाजूस बोळात असलेल्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला परंतु पैसे असलेली तिजोरी चोरट्यांना उघडता आली नाही. यामुळे चोरट्यांचा डाव अयशस्वी ठरल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात शाखा व्यवस्थापक विजय पाटील यांनी तक्रार दिली आहे.


भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे, हवालदार किरण तायडे, काझी, पोलीस पाटील एकनाथ सपकाळ, पोलीस पाटील किशोर बोरोले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
शुक्रवार, 3 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजून 28 मिनिटांनी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बँकेच्या मागील बाजुस असलेला वीज बल्ब काढला. हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य सुनील भिरूड यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. यासंदर्भात पोलीस पाटील किशोर बोरोले यांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब उघडकीस आली असून ग्रामीण भागात चोर्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.





