भुसावळातील हॉटेल नरीमनच्या संचालकाची फसवणूक : मामा-भाच्याविरोधात गुन्हा


भुसावळ (4 जानेवारी 2025) : शहरातील हॉटेल नरीमन पॉईंटवर कामावर असलेल्या नोकरानेच हॉटेल मालकाशी झालेल्या वादानंतर परस्पर एक लाख 15 हजारांची रक्कम खात्यावर वळती करीत 23 लाख 90 हजार सहाशे रुपयांचा धनादेश टाकून रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नोकरासह त्याच्या साथीदाराविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
आदिल रुसी कविना (57, मॉडर्न रोड, भुसावळ) यांच्या मालकिचे बसस्थानकाजवळ हॉटेल नरीमन पॉईंट आहे व तेथे गेल्या काही वर्षांपासून संशयीत कृष्णा संजय उपाध्याय (28, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) हा कामास होता. 28 ऑक्टोबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान संशयीताने हॉटेलमधील चार होंडा कंपनीचे जनरेटर नेले व नंतर रिक्षा चालक आबीद खान यांच्या माध्यमातून नादुरुस्त अवस्थेत परत केले शिवाय विश्वासाने सोपवलेल्या 12 धनादेशापैकी एक धनादेशावर एक लाख 15 हजारांची रक्कम टाकून तो धनादेश कृष्णा याने मामा सुमित नारायण तिवारी (भुसावळ) यांच्या खात्यावर जमा केला तसेच पुन्हा 23 लाख 90 हजार सहाशे रुपयांचा धनादेश बँकेत टाकण्यात आला मात्र सुदैवाने खात्यात रक्कम नसल्याने या धनादेशाचा अनादर झाला.


आपली फसवणूक नोकरानेच केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आदिल रुसी कविना यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत आरोपी कृष्णा संजय उपाध्याय व त्याचा मामा सुमित नारायण तिवारी विरोधात तक्रार नोंदवली. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !