तुम्ही मते देऊन मला सालगडी केलंय का ? : कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चढला पारा
बारामती (5 जानेवारी 2025) : तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले. बारामतीमध्ये एका कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन देताना अनेक कामे झाली नसल्याचे म्हटल्यानंतर अजित पवारांचा पारा वाढल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यावर काढला संताप
बारामतीमधील मेडद येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवार भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांना नागरिकांनी निवेदने दिल्यानंतर त्यांनी कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या व याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचे म्हटले. त्या कार्यकर्त्याच्या वक्तव्यानंतर इतर काही नागरिकांनीही तीच री ओढली. यानंतर मात्र, अजित पवार यांनी अरे तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?’, असा सवाल करत त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.





