जळगावसह राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा कधी ? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली ‘ही’ तारीख
When will the names of the guardian ministers of the state including Jalgaon be announced ? Chandrashekhar Bawankule said ‘this’ date नागपूर (14 जानेवारी 2025) : राज्यभरात अद्यापही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने संभ्रम वाढला आहे. शिवाय ‘तारीख पे तारीख’ समोर येत असल्याने नावांबाबत सन्पेन्स अधिकच वाढला आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी 16 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असा आशावाद व्यक्त केला.
16 पर्यंत निश्चितपणे मार्ग निघेल
पालकमंत्रिपदाबाबत तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती व 15 ते 16 जानेवारीपर्यंत निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कुठलाही अजेंडा नव्हता व लोकहिताचे कुठलेही धोरण नव्हते.

केवळ भाजप व महायुतीचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. आम्ही मात्र एकत्रित आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयारीत आहे. आमचा पक्ष कधीही निवडणुकीला सज्ज असतो. उद्यादेखील निवडणूक लागली तरी आमची तयारी आहे त्यामुळे वेगळ्या तयारीची गरज नाही. या निवडणुकीत महायुती राज्यात क्रमांक एकवरच असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपकडून सदस्यता नोंदणीवर भर देण्यात येत आहे. दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 15 दिवसांत ही संख्या गाठण्यात यश येईल. त्यानंतर बुथप्रमुख, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
