रावेर वनविभागाची मोठी कारवाई : लाकडाची अवैध वाहतूक रोखत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
रावेर (29 जानेवारी 2025) : वनविभागाच्या गस्ती पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत लाकडाची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप आणि टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला. या कारवाईत बोलेरो पिकअप आणि टाटा कंपनीच्या ट्रकसह आठ लाख 10 हजार 878 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे व सहकारी सावदा-तांदळवाडी रस्त्याने मंगळवारी रात्री गस्त करीत असताना तांदळवाडी गावाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप संशयास्पद आढळली. वाहनाचा पाठलाग गस्ती पथकाने केल्यानंतर वाहन (क्रमांक एम.एच.04 जी.एफ. 7263) मधून 25 साग इमारती नगांचा माल जप्त करण्यात आला. वाहन चालक युवराज सीताराम तायडे (मांगलवाडी) यांच्याकडे परवाना नसल्याने वाहनासह लाकूड जप्त करण्यात आले. 43 हजार 116 रुपये किंमतीचे सागवानी लाकूड व तीन लाख 45 हजार रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीच्या पिकअप मिळून तीन लाख 88 हजार 116 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




पाडळे गावाजवळ दुसरी कारवाई
वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे हे पाडळे खुर्द भागात गस्त घालत असताना मौजे पाडळे खुर्द गावाजवळ टाटा कंपनीची ट्रक (एम.पी.45 एच.0342) जप्त करण्यात आली. या वाहनात पंचरास जळावू तसेच निम इमारती लाकूड आढळले तर वाहन चालक नामे शेख कलीम शेख इलियास (रावेर) याच्याकडे लाकूड वाहतुकीचा पास नसल्याने 38 हजार 115 रुपये किंमतीचे पंचरास जळावू लाकूड व तीन लाख 81 हजारांचा ट्रक मिळूनप एकूण चार लाख 22 हजार 762 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील, रावेर रेंज वनरक्षक थवर्या बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला, निलेश बारेला, वनपाल राजेंद्र सरदार, वनरक्षक सविता वाघ, जगदीश जगदाळे, सुभाष माळी, इनुस तडवी आदींच्या पथकाने केली.