भुसावळात शालेय पोषण आहारातील पुलावमध्ये आढळले धनोर
दिनदयाळ नगरातील पालिका शाळा क्रमांक 35 मधील प्रकाराने संताप
Dhanor found in pulao of school nutrition in Bhusawal भुसावळ (3 फेब्रुवारी 2025) : शहरातील पालिकेच्या दिनदयाळ नगरातील शाळा क्रमांक 35 मध्ये बालकांना दिल्या जाणार्या पोषण आहारात अळ्या व धनोर आढळून आले. या भागाचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांना पाहणी दरम्यानच हा गंभीर प्रकार आढळून आला. या प्रकरणी त्यांनी तालुका गटशिक्षण अधिकारी व शालेय पोषण आहार विभागाला संपर्क साधून याची देही याची डोळा हा प्रकार दाखवला. या प्रकरणी अधिकार्यांनी पंचनामे केले असून संबधीत ठेकेदाराच्या गोदामात जावूनही पाहणी करुन पुलावमध्ये आढळून आलेले किड लागलेले सोयाबीन जप्त करण्यात आले.
माजी नगरसेवकाने उघडकीस आणला प्रकार
प्रभाग 35 चे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे शाळेत भेट दिली. यावेळी बालकांना दिल्या जाणार्या पोषण आहारात अळ्या व धनोर असल्याचे आढळले. त्यांनी शिक्षिका व मदतनीस यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी यापूर्वीही आहारात लोखंडी खिळा व एकवेळा कॉक्रोज आढळून आल्याचे सांगितले. ठेकेदाराला सांगूनही सुधारणा होत नसल्याची माहिती दिली. यानंतर ठाकूर यांनी गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे व शालेय पोषण आहार अजित तडवी यांना घटनास्थळी बोलवले. त्यांनाही हा प्रकार आढळल्याने पंचनामा करण्यात आला. या प्रकरणाचा पाठपुरावा करुन सबंधीत ठेकेदाराचा परवाना रद्द करु अशी माहिती यावेळी महेंद्रसिंग ठाकूर यांनी दिली.


मुलांना दिली वरणबट्टी
किडयुक्त पोषण आहार असल्याने तो बालकांना देण्यात आला नाही. मात्र बालकांना भोजन मिळावे, म्हणून माजी नगरसेवक ठाकूर यांनी मुलांसाठी वरण, बट्टी, वांग्याची भाजीची व्यवस्था करुन जेवण दिले. यासोबतच जेवणानंतर आईसक्रिमही देण्यात आले. यामुळे भुकेल्या पोटी घरी जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली नाही.
ठेकेदाराच्या गोदामाची झाडाझडती
पंचनामा करताना शिक्षण विभागाने संबधीत ठेकेदाराला मोबाईलवर संपर्क साधून घटनास्थळी बोलवले मात्र आपण आजारी असल्याचे सांगून त्याने येणे टाळले. यानंतर अधिकारी थेट संबधीत ठेकेदाराच्या कलानगर भागात असलेल्या गोदामावर पोचले. या ठिकाणीही पुलावमध्ये टाकण्यात आलेल्या सोयाबीनची पाहणी केली असता, त्यातही धनोर व अळ्या आढळून आल्या. सोयाबीनची ही पिशवीही सिलबंद करुन ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.






