वरणगावात गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक
वरणगाव शहर पोलिसांची कामगिरी : एक संशयीत पसार
Villager arrested in Varangaon, two arrested with two live cartridges वरणगाव (14 फेब्रुवारी 2025) : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील तरुणांकडे गावठी कट्टा व जिवंत काडतूस असल्याची माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत दोघांना पकडले तर एक संशयीत पसार झाला. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस तसेच बुलेट जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सहा वाजता महात्मा गांधी विद्यालयाजवळ करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगाव शहरात रेल्वे स्टेशन रोडवर महात्मा गांधी विद्यालयाच्या पुढे एका टपरीजवळ दोन संशयीत बुलेटवर अवैधपणे गावठी पिस्तूल घेवून दहशत निर्माण करत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. संशयीत आरोपी आदेश ज्ञानेश्वर भैसे (19, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) व गौरव संतोष इंगळे (20, रा.वामन नगर, वरणगाव) यांना अटक करण्यात आली.



संशयीतांकडून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस व 75 हजार रुपये किंमतीची बुलेट (क्रमांक एम.एच.12 डी.एन.9097) असा 99 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीत सोनू सुनील भालेराव (सिद्धेश्वर नगर, वरणगाव) हा पसार झाला असून तिघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद शेनफडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र सीताराम तायडे करीत आहेत





