जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दोन कंपन्यांमध्ये चोरी करणार्या टोळीला बेड्या
जळगाव (18 फेब्रुवारी 2025) : जळगावच्या एमआयडीसी हद्दीत दोन कंपन्यांमध्ये चोर्या करणार्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
साई प्रेरणा कंपनीत झाली होती चोरी
साई प्रेरणा इंडिस्ट्रीज या कंपनीतून तीन लाख तीन हजार रुपये किंमतीचे तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या वायरिंग, इलेक्ट्रीक मोटार, हीट कंट्रोलर, पॅनल, लोखंडी पॅनल, लोखंडी बिम रोल, दोन गेअर बॉक्स, ट्रांसफार्मर, प्लास्टीकच्या 30 भरलेल्या व्हर्जीनच्या दाण्याच्या बॅग चोरीला गेला होता.



या प्रकरणी संशयीत उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत, (रा.सुप्रीम कॉलनी), आकाश सुरेश शिंदे, (रा.साईनगर, कुसूंबा), पृथ्वीराज उर्फ डुबर्या बच्चन बागडे यांना अटक करीत त्यांच्याकडून एक लाख 11 हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.
दुसर्या कंपनीतील चोरीची उकल
एमआयडीसीतील एन/98 मधील महालक्ष्मी युनी एक्झीम कंपनीतील 50 हजार रुपये किमतीचे दोन किलो चांदीचे साहित्य, पुजेसाठी ठेवलेले चांदीचे भांडे, एक किलो वजनाचे चांदीचे नाणे, पुजेसाठी वापरले जाणारे ताट, घंटी, प्लेट, लोटा, अगरबत्ती स्टँड वगैरे आदी मिळून दोन किलो वजनी चांदी व 60 हजारांची रोकड चोरीला गेली होती.
या प्रकरणी प्रकाश उर्फ गिड्डा काळू राठोड, गोविंदा उर्फ लल्ला देविदास ढालवाले (दोन्ही रा.सुप्रीम कॉलनी) यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून 22 हजार रुपये जप्त करण्यात आले तर आरोपींच्या साथीदारांचा पोलीस शोध सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, योगेश बारी करीत आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, सिद्धेश्वर डापकर, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, योगेश घुगे आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.





