दहा हजारांची लाच भोवली : नाशिक वनविभागातील एसीएफसह वनपाल एसीबीच्या जाळ्यात
ACF of Nashik Forest Department along with forest guard caught by ACB नाशिक (18 फेब्रुवारी 2025) : नाशिक व ईगतपुरीतील वनविभागाच्या एसीएफसह वनपालावर दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक एसीबीने कारवाई केल्याने लाचखोर हादरले आहेत. उप वनसंरक्षक अधिकारी वर्ग-1 शिरीषकुमार सजन निर्भवणे (54) व वनपाल सुरेश कारभारी चौधरी (44)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, वर्ग एकचा अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने वनविभागातील लाचखोर पुरते हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
34 वर्षीय तक्रारदारासह साक्षीदाराने त्यांच्या शेतातील जांभळाचे व सादडाचे जुने वाळलेले झाडाचे लाकूड पिकअप (क्र.एम.एच.04 ए.एस. 8077) मध्ये भरून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना फ़ॉरेस्ट खात्याचे एसीएफ निरभवने तसेच वनपाल सुरेश चौधरी व कावेरी पाटील यांनी 31 जानेवारी 2025 रोजी पिकअप ताब्यात घेत मेरी मसरूड कार्यालयात लावली. निरभवणे व सुरेश चौधरी यांच्या मार्फत दोन हजार रुपये दंड व लाच म्हणून 10 हजारांची मागणी मंगळवार, 18 रोजी करण्यात आल्यानंतर तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला.



चौधरी याने दंडासह 12 हजार रुपये स्वीकारताच एसीएफ निरभवने यांना फोन करीत दहा हजार लाच रुपये मिळाल्याची सांगितले व निरभवने यांनी लाचेला संमती देत गाडीची ऑर्डर घायला पाठवून दे, असे फोनवर सांगताच त्यांनाही अटक करण्यात आली. आरोपींविरोधात वाडीवर्हे पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीणला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सुनील पवार, नाईक योगेश साळवे, चालक हवालदार विनोद पवार यांनी हा सापळा यशस्वी केला.





