गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शक्ती प्रदर्शन ; मुख्य मार्गांवर पोलीस बंदोबस्ताचा आढावा
भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव व आगामी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भुसावळ पोलीस दलातर्फे बुधवार, 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील विविध भागातून पोलिसांनी पथसंचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च निघाला.
संवेदनशील भागातून रूट मार्च
रूट मार्चची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन चौकीजवळ) येथून करण्यात आली. त्यानंतर मॉडर्न रोड, गांधी पोलीस चौकी, सराफ बाजार, जामा मशीद, मरीमाता मंदिर, अप्सरा चौक, डिस्को टॉवर, भारत मेडिकल, वाल्मीक चौक, पांडुरंग टॉकीज, दगडी पुलाखालून, गवळीवाडामार्गे कुंभारवाडा येथे मार्चचा समारोप झाला. या मार्गावरून जाताना पोलीस दलाने संवेदनशील भागांचा आढावा घेत नागरिकांमध्ये सुरक्षा व विश्वासाचे वातावरण निर्माण केले.



यांचा रूट मार्चमध्ये सहभाग
या रूट मार्चमध्ये शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार, एक आरसीपी प्लाटून तसेच होमगार्ड पथक वाहनांसह सहभागी झाले होते. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हा रूट मार्च महत्त्वाचा मानला जात आहे. प्रमुख मिरवणूक मार्गांवर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
