वड्रीत 50 वर्षीय इसमाला रस्त्यात पडलेल्या साहित्याच्या वादातून मारहाण
यावल (18 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील वड्री गावात रस्त्यात पडलेल्या साहित्यावरून वाद झाला आणि 50 वर्षीय इसमाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच काठीने त्यांच्या पाठीवर व डोक्यात मारून दुखापत केली. ही घटना सोमवारी घडली. जखमी अवस्थेत इसमाने यावल पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला उपचाराकरिता रुग्णालयात पाठवले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगावी हलविण्यात आले.
वड्री, ता.यावल या गावातील रहिवाशी छबु बक्षू तडवी (50) हे सोमवारी आपल्या घरी जात असताना रस्त्यात पडलेल्या साहित्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यांना गावातील दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली. लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारून दुखापत केली. रक्त बंबाळ अवस्थेत ते यावल पोलीस ठाण्यात दाखल झाले.. यावल पोलिसांनी त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यांच्या डोक्यात जबर वार झाल्यामुळे त्यांच्या कानातून रक्त निघत होते. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.सहर हमदुल्ले, परिचारिका मंजुषा कोळेकर यांनी प्रथमोपचार केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले.








