सेंद्रीय शेतीतून शेतकरी होतील समृद्ध : रजनी सावकारे

भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात शेतकरी कार्यशाळा


भुसावळ (20 फेब्रुवारी 2025) : सेंद्रीय शेतीला मोठी मागणी असून त्यातून शेतकरी बांधवांना आरोग्यदायी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न होता येईल. रासायनिक खते आणि कीटक नाशक यांच्या अतिरिक्त वापरामुळे कॅन्सरसारख्या विकारांचे प्रमाण वाढते, असे मत भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील दे.ना.भोळे महाविद्यालयात प्रथमच एक दिवसीय शेतकरी कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, वनस्पती शास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा नुकतीच झाली. उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून विषमुक्त शेतीच्या प्रचारक रजनी संजय सावकारे यांच्याहस्ते झाले अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. व्यासपीठावर मनोहर पवार, ए.डी.पाटील, नारायण पाचपांडे उपस्थित होते.


शेतीसोबत गोपालनाचे आवाहन
रजनी सावकारे म्हणाल्या की, अनेक उच्च शिक्षित व्यक्तींनी नोकरी सोडून सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली आहे तसेच देशी गायीचे गोपालन सुरू केले आहे. याद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळवली जात आहे त्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगही केली जात असल्याने सेंद्रीय शेती आणि गोपालन करण्याचे आवाहन सावकारे यांनी केले.

ग्रामीण भागात कार्यशाळा : प्राचार्य
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व सांगत समूह शेती आणि त्रिस्तरीय शेतीची संकल्पना मांडली. त्या सोबतच एकत्रीत शेतीमुळे होणारे संभाव्य फायदे ही सुचले. पुढील वर्षी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून
भुसावळ तालुका कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी प्रमोद जाधव यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देत देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याचे सांगितले.

माजी कृषी अधिकारी ए.डी.पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी शेतीसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. शेतीच्या बांधावर वृक्षाची लागवड, खत निर्मिती, पीक विमा, ठिबक सिंचन अनुदान, कुटुंब जॉब कार्ड काढावे इ. योजनेसाठी अर्ज कसा करावा पाठपुरावा कसा करावा त्यांनी माहिती दिली.

प्रगतशील शेतकरी नारायण पाचपांडे यांनी आधुनिक शेती पद्धती कशी करावी याबाबत माहिती दिली. पॉली हाऊस, जल संधारणामार्फत विविध बांध, माती परीक्षण करून विविध प्रयोग करून खर्च कमी करून उत्पन्न वाढविले पाहिजे, आंतरराष्ट्रीय बाजारात काय मागणी आहे याचा अभ्यास करून उत्पन्न काढून उद्योगाप्रमाणे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

मनोहर पवार यांनी सेंद्रीय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगत सेंद्रीय व रासायनिक शेती यातील फरक सांगून त्यातील फायदे व तोटे सांगितले. देशी गायीपासून घरीच सेंद्रीय खत तयार करता येते तसेच रासायनिक खते प्रत्यक्ष न वापरता साध्या पद्धतीने खते कशी तयार करायची याची सविस्तर माहिती दिली.

उपस्थित शेतकर्‍यांमधून उज्वला पाटील, सुनील गोरडे, राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केला. मयूर महाजन म्हणाले की, शेतकी महाविद्यालय नसले तरी येथील प्राचार्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांनी शेतकरी वर्गासाठी कार्यशाळेचा विचार करून विद्यार्थीच्या पालकांसाठी ही मेजवानी उपलब्ध करून दिली त्याचा शेतकरी पालक यांना खूपच फायदा होणार आहे. या कार्यशाळेसाठी महिला व पुरुष मिळून 60 शेतकरी उपस्थित होते. प्रस्तावना प्रा.डॉ.माधुरी पाटील तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाघन एस.राणे व आभार प्रा.एस.डी.चौधरी यांनी मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.धनश्री पाटील, प्रा.डॉ.दयाघन एस.राणे, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.श्रेया चौधरी, डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.सुशीला भाटे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.दीपक जैस्वार, शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद नेमाडे, प्रकाश चौधरी, प्रमोद नारखेडे, राजेश पाटील, विजय पाटील, दीपक महाजन, सुधाकर चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर आदींनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !