धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसासह पारोळ्यातील दोघे जाळ्यात


Dhule LCB arrests with country-made pistol धुळे (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा (पिस्तूल) व जिवत काडतुसे बाळगणार्‍या पारोळा तालुक्यातील दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोटारसायकल मिळून एकूण 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार, 6 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. जगदीश पुंडलिक पाटील (23) व अजय पितांबर भिल (19, पिंपळकोठा, ता.पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
महाराष्ट्र शासनाच्या अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दोन संशयीत गावठी कट्टा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पथकाने सापळा रचला व धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नवलनगर, जि.धुळे गावाजवळ दुचाकीवरून येणार्‍या संशयीताना 6 ऑगस्ट रोजी अडवण्यात आले.
चौकशीत संशयीताच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल), एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.54 डी.2151) असा एकूण 81 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



आरोपींना कोठडी : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी जगदीश पाटील याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींनी शस्त्र कुणाकडून खरेदी केले ? याचा तपास सुरू आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक दीपक ढोके, अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, हेमंत बोरसे, दिनेश परदेशी, योगेश चव्हाण, मच्छिंद्र पाटील, देवेंद्र ठाकूर, अतुल निकम, हर्षल चौधरी, सुनील पाटील, अमोल जाधव, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !