भुसावळात शिवरायांना अभिवादनासाठी उसळली गर्दी

शिवजयंती उत्साहात : पालखी, मशाल रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष


भुसावळ (20 फेब्रुवारी 2025) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तारखेनुसार) शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण होते. भगव्या पताकांनी शहर सजवण्यात आले तर जयंतीनिमित्त मध्यरात्रीपासून शहरातील रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. शहरात जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या व महिलांनी काढलेल्या मशाल रॅलीने लक्ष वेधले होते.

शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
शहरातील रेल्वे स्थानकाजवळील छत्रपतींच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त आकर्षक रोशनाई करण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस उपस्थित पदाधिकार्‍यांनी अभिषेक केला. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पुतळ्यास माल्यार्पण केले. सकल मराठा समाज शहर व तालुकातर्फे रवींद्र ढगे यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी नगरातून बुधवारी सकाळी 11 वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली व चार तासानंतर मिरवणुकीचा समारोप झाला.


पालखीने वेधले लक्ष
शहरातील स्वराज्य सेनेतर्फे सुध्दा सकाळी 11 ते 4 या वेळात प्रशांत संतोष बागले यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवप्रेमींच्या हाती भगवे झेंडे होते. कार्यकर्ते डिजेच्या वाद्यावर थिरकले. शिवजयंतीनिमित्त जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून मयुर जाधव यांनी आयोजित केलेली छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत सुध्दा अनेक शिवभक्त होते, विशेष करून विद्यार्थिनींचा अधिक सहभाग होता. पालखीच्या पुढे ढोल-ताशे हे पारंपारीक वाद्य वाजविण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिलांनी मशाल रॅलीचे आयोजन केले. ही मशाल रॅली जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून दुपारी चार वाजता निघाली. या रॅलीत सुमारे 100 महिलांचा सहभाग होता.

भोळे महाविद्यालय, भुसावळ
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा मांडला. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक महाजन व विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराज यांना घडवण्यात जिजाऊ मातेचे महत्वपूर्ण योगदान असून छत्रपतींनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते युगपुरुष होते. असा प्रजापालन करणारा राजा पुन्हा होणे नाही, असे प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले. सर्व प्राध्यापकांनी पुष्प अर्पण करून जयजयकार करून आपली मानवंदना दिली. याप्रसंगी प्रा.अनुपम शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, डॉ.विवेक जोशी, अनुराग साळुंखे, बद्री प्रसाद केवट, कोमल भट व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

प.क.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ
शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात समारंभ समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यलयाच्या उप-प्राचार्या डॉ.जान्हवी तळेगावकर होत्या. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल व कार्यपद्धतीबद्दल प्रथम वर्ष कला वर्गाच्या विद्यार्थिनी कविता बारेला व जयश्री सोनवणे यांनी माहिती दिली. डॉ.जान्हवी तळेगावकर म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या विचारातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांमधून आपण प्रेरणा घेऊन समाजासाठी व देशासाठी कार्य करत राहिले पाहिजे. कार्यक्रमात महाविद्यालयाचे उप- प्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी डॉ.मीना चौधरी, प्रा.के.सी.सूर्यवंशी, प्रा.आर.एच.पाटील, प्रा.निलेश गुरुचल यांनी परिश्रम घेतले.

के.नारखेडे विद्यालय, भुसावळ
शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रुपल ललित नेहेते व इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी पूर्वी न्हावकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटाविषयी वक्तृत्व सादर केले. याप्रसंगी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांसहित संगणक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज कुलकर्णी यांनी केले.

द वर्ड स्कुल, भुसावळ
कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित द वर्ल्ड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस उजाळा दिला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. ह्या कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

सेट पॉल स्कूल, भुसावळ
साकरी फाटा जवळील सेंट पॉल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव समीर शेफर्ड, मुख्याध्यापिका रुबीया शेफर्ड यांनी छत्रपती शिवाची महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव समीर शेफर्ड यांनी छत्रपती शिवाची महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा साकारल्या. याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !