वराडसीमच्या विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाले दाखले

भुसावळ तहसीलदार निता लबडे यांचा स्तुत्य उपक्रम : आगामी काळात शाळा स्तरावरच मिळणार दाखले


भुसावळ (21 फेब्रुवारी 2025) : शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना ग्रामीण भागातून शहरात येवून पायपीट करावी लागत होती व त्यात वेळेसह पैसा खर्च करावा लागत होता. या त्रासातून सुटका होण्यासाठी भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांनी ग्रामीण भागातील शाळेतच शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व सेतू सुविधा चालकांची बैठक घेवून शाळा स्तरावरच महाराजस्व अभियान अंतर्गत दाखले देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी वराडसीमच्या पंडित नेहरू विद्यालयात बुधवारी करण्यात आली. शाळा स्तरावर मिळालेल्या दाखल्यांमुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते.

143 दाखल्यांचे वाटप
विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणारे आवश्यक व महसूल विभागाकडून वाटप होणारे जातीचे दाखले, वय अधिवास, राष्ट्रीयत्व, आर्थिक दुर्बल घटक, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न दाखल्यांचे बुधवार, 19 रोजी वराडसीम येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात वाटप करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीतील एकूण 49 विद्यार्थ्यांना जातीचे दाखले तर अन्य 84 विद्यार्थ्यांना अन्य दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी घ्यावी गरूड भरारी
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व गरूड भरारी घेवून गावासह शहराचा नावलौकीक उंचवावा, असे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी यावेळी केले.

आदिवासी महिलांनाही मिळणार दाखले
वराडसीम ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत दक्षता समितीची बैठक घेवून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. तहसील कार्यालयाच्या संबंधित काही अडचणी व समस्या ऐकून घेण्यात आल्या. यावेळी आदिवासी जमात योजनेचा लाभ मिळत नसल्याची तसेच जातीचे दाखले मिळत नसल्याची तक्रार आल्यानंतर मंडळाधिकार्‍यांना स्थानिक चौकशी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या व लवकरच दाखले मिळतील, असे आश्वासन दिल्यानंतर आदिवासी महिलांचे चेहरे खुलले. असा उपक्रम यापुढे प्रत्येक गावात घेतला जाईल, असे तहसीलदार म्हणाल्या.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !