मजुरांच्या पत्री शेडसमोर अवैध वाळू खाली केल्याने दबून पाच मजुरांचा मृत्यू
जाफराबाद (22 फेब्रुवारी 2025) : साखर झोपेत पत्री शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर टीप्पर चालक काळ बनून आला व पाच मजुरांचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ येथे घडली. मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणल्यानंतर टीप्पर चालकाने वाळू पत्र्याच्या शेडजवळ रीकामी केली व या वाळूखाली दबले जावून मजुरांचा मृत्यू ओढवला.
पाच जणांचा जागीच मृत्यू
गणेश काशिनाथ धनवई (40, गोळेगाव), भूषण गणेश धनवई (16, गोळेगाव) व सुनील समाधान सपकाळ (20, रा.पद्मावती) यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला. टिप्पर चालक जाफराबाद तालुक्यातील असून तो रात्री घटना घडतात पसार झाला तर ग्रामस्थांनी मदत करून एका मुलीचे प्राण वाचवले.



काय घडले नेमके
जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावर पुलाचे काम सुरू असून या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते. दरम्यान रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते. एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याने घाई गडबडीत अंधारामध्ये त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू उतरवली यात वाळूखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सकाळीच महिलांचा आक्रोश दिसून आला.





