!-- afp header code starts here -->

मामलदे येथून श्री क्षेत्र मुक्ताई मेहूण येथे निघालेल्या दिंडीचे स्वागत


यावल (23 फेब्रुवारी 2025) : चोपडा तालुक्यातील श्री क्षेत्र मामलदे ते श्री क्षेत्र महंतग्राम मेहूण आदिशक्ती मुक्ताई संस्थान मेहूण येथे दरवर्षी पायी दिंडी जाते. या दिंडीचे यावल शहरात मुस्लिम बांधवाने भव्य स्वागत केले आणि विशेष म्हणजे त्यांनी दिंडीत सहभागी सर्व भाविकांना स्नेहभोजन देत जातीय सलोखा बळकट केला.

या कार्यक्रमाला आमदार अमोल जावळे यांची उपस्थिती होती. मुस्लीम समाजबांधवांनी शहरातील कोळेश्वर श्रीराम मंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. शहरातील श्री कोळेश्वर श्रीराम मंदिरात यावल शहरातील ठाकूर फोटो फ्रेमचे संचालक छब्बीर मुसा पटेल उर्फ ठाकूर यांनी मामलदे, ता.चोपडा येथून श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थान मेहूण येथे जात असलेल्या पायी दिंडीचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला. यावल शहरातील कोळेश्वर श्री राम मंदिरामध्ये दिंडीतील भक्त, भाविकांचा मुक्काम ठेवण्यात आला. हभप भगवान विठ्ठल गुजर मामलेदे यांच्या नेतृत्वात ही दिंडी यावल शहरात दाखल झाली व दिंडीतील सहभागी भाविक, भक्तांना या ठिकाणी स्नेहभोजन देण्यात आले. सुमारे 175 जणांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री क्षेत्र मामलदे, ता.चोपडा येथून निघालेली ही दिंडी 27 फेब्रुवारी रोजी मेहुणे येथे पोहोचणार आहे. या कार्यक्रमात आमदार अमोल जावळे यांची देखील उपस्थिती होती. या ठिकाणी दिंडीतील बांधवांना मुस्लिम समाज बांधवांकडून देण्यात आलेल्या या मानसन्मानामुळे यावल शहरात जातीय सलोखा अधिक बळकट झाला आहे.

माणुसकी धर्म महत्वाचा
मामलदे या गावाशी आपले जवळचे संबध आहेत व आपण माणुसकी धर्म मानतो. जेथे ऋणानुबंध असतात तेव्हा आपण आपुलकीने वागले पाहिजे याच उद्देशातून परमेश्वरावर श्रध्दा असणार्‍यांना आपणदेखील काही तरी द्यावे व यातुन ऋणानुबंध बळकट करावे या उद्देशातून आपण हा कार्यक्रम घेतला. यातून आत्मीक समाधान मिळाले, असे प्रसंगी छब्बीर पटेल यांनी सांगितले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !