चिंचोलीत पाय घसरून विहिरीत पडल्याने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू


यावल (27 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेतविहिरीत बकर्‍यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तरुणी घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली आणि हंडा दिसून आला. बुधवारी सकाळपासून शोध मोहिम सुरू करण्यात आली व तिचा मृतदेह विहिरीत मिळून आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रज्ञा सुरेश साळुंखे (20) असे मयताचे नाव आहे

प्रज्ञा ही तरुणी मंगळवारी शेत शिवारात त्यांच्या बकर्‍यांच्या गोठ्यात गेली व बकर्‍यांना पाणी पाजण्याकरिता ती तिच्या गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. तेथे हंडा आणि बादली घेऊन ती विहिरीवर पाणी भरत होती. तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पाण्यात बुडाली.




मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली आणि हंडा मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले मात्र काही दिसले नाही तेव्हा बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांना पाठवले. विहिरीत प्रचंड पाणी असल्यामुळे या तरुणीचा शोध घेण्याकरिता पाण्यात बुडणारे कॅमेरे मागवण्यात आले व ती विहिरीच्या खोल पाण्यात तळाशी असल्याचे दिसुन आले. दुपारी दोन वाजता मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे व डॉ.प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !