जळगावात अपघाताची मालिका कायम : भरधाव डंपरच्या धडकेने शहरातील युवक ठार
जळगाव (1 मार्च 2025) : शहरात अपघाताची मालिका काय आहे. महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने शहरातील युवक ठार झाला तर सोबतचा युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. फैजल मुस्ताक पटेल (20, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.
महाविद्यालयात जाताना अपघात
मयत फैजल हा आई-वडील यांच्यासह मास्टर कॉलनीत वास्तव्याला होता. फैजलचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फैजल पटेल हा अरुणाबाई फार्मसी महाविद्यालय येथे तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. शनिवार, 1 मार्च रोजी फैजल पटेल हा त्याचा वर्गातील मित्र वासीक खान युसूफ खान (20) सोबत ममुराबाद येथील फार्मसी महाविद्यालयामध्ये जात असताना ममुराबाद रोडवर बायपास रस्त्यावर अज्ञात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये फैजल पटेल व वासीक खान हे गंभीर जखमी झाले.



त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याच्या मित्रांनी दाखल केले असता त्या ठिकाणी फैजल खान याला तपासून वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. वासीक खान याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान महाविद्यालयीन तरुणाच्या मृत्यूमुळे मास्टर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.




