फळ पीक विम्याचा लाभ न मिळालेल्या शेतकर्यांना लवकरच लाभाची रक्कम मिळणार : मंत्री रक्षा खडसे यांची माहिती
मुक्ताईनगर (3 मार्च 2025) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार खरीप 2024 व रब्बी 2024-25 अंतर्गत विमा उतरविलेल्या मात्र बँकेमार्फत खात्यात पैसे न आलेल्या शेतकर्यांना लवकरच रकमेचा लाभ होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार खरीप 2024 व रब्बी 2024-25 अंतर्गत विमा उतरविलेल्या मात्र बँकेमार्फत पैसे वजा होऊन सुद्धा पीक विमा पोर्टलवर तांत्रिक कारणामुळे पैसे जमा न झालेल्या शेतकर्यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागामार्फत 3 ते 13 मार्च 2025 दरम्यान बँकेसाठी विशेष विंडो खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित बँक शाखांनी रक्कम चलनाद्वारे अपलोड करून देता येणार आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी विभाग यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. पीक विमा काढलेल्या व शेतकर्यांच्या खात्यातून पिम्याची रक्कम वजा होवूनही विमा कंपनी पोर्टलवर पैसे जमा न झाल्याने वा पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आलेल्या शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे.





