कुविख्यात गुन्हेगाराचा पोलीस उपायुक्तासह सहाय्यक निरीक्षकावर हल्ला
चाकण (3 मार्च 2025) : सराईत गुन्हेगाराने पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. संशयीता पकडताना झालेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय घडली घटना ?
सोमवारी रात्री सव्वा बारा वाजेनंतर चिंचोशी ते केंदूर रस्त्यावर चिंचोशी ता. खेड च्या घाटामध्ये मंदिराजवळ विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन चंदर भोसले व मिथुन चंदर भोसले (दोघेही रा.खरातवाडी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जर्हाड यांनी सापळा लावला.

आरोपीला अटक करते वेळी आरोपी सचिन भोसले याने त्याच्या कडील कोयत्याने पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार व प्रसन्न जर्हाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला व जखमी केले. पोलीस उपायुक्त पवार यांनी त्यांच्या व सोबतच्या अंमलदाराच्या स्वसंरक्षणार्थ पिस्तूल मधून दोन काडतूस फायर केले.
त्यापैकी एक काडतूस सचिन भोसले याच्या उजव्या पायाच्या नडगीला लागून तो जखमी झाला. सचिन भोसले याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन भोसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
