हातावरील ‘अक्षय’ नावाने पटली मायलेकाची ओळख; मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरील घटनेचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात शनिवार, 5 रोजी माय-लेकाने रेल्वेखाली झोकून देत टोकाचा निर्णय घेतला होता. मृतांची ओळख पटली असून पल्लवी अक्षय बनकर (26) आणि त्यांचा चार वर्षीय मुलगा दक्ष अक्षय बनकर (दोघे रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी) अशी माय-लेकाची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केल्यानंतर त्यांची ओळख निश्चित झाली.
हातावरील टॅटूमुळे मिळाला महत्त्वाचा धागा
घटनेनंतर मृत महिलेच्या अंगावर ओळख पटविणारी कोणतीही कागदपत्रे आढळली नव्हती. मात्र, तिच्या हातावर बदामाच्या आकारात ‘अक्षय’ असे नाव गोंदलेले होते. पोलिसांनी याच खुणेच्या आधारे महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर या खुणेमुळे मिळालेल्या धाग्याला नातेवाइकांच्या ओळखीने दुजोरा मिळाला.
पतीचे दीड महिन्यापूर्वी निधन
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पल्लवी यांच्या हातावर गोंदलेले ‘अक्षय’ हे त्यांच्या पतीचे नाव होते. अक्षय बनकर यांचे अवघ्या दीड महिन्यापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर पल्लवी मानसिक तणावातून जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि कारणांचा तपास पोलीस करत आहेत.
तपोवन एक्स्प्रेसच्या मार्गावर घटना
शनिवारी दुपारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरातून जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
नातेवाइकांनी केली ओळख
घटनेनंतर पोलिसांसमोर मृत महिलेची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान होते. हातावरील ‘अक्षय’ या नावाच्या टॅटूसह इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला. रविवारी दुपारनंतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली. त्यानंतर मृत महिला पल्लवी बनकर आणि चिमुकला दक्ष बनकर असल्याचे स्पष्ट झाले.

