मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी : सिनेस्टाईल डिझेल चोरट्यांना बेड्या
मुक्ताईनगर (8 मार्च 2025) : भुसावळ तालुका हद्दीतून डिझेल चोरी करून मुक्ताईनगरकडे पसार होणार्या डिझेल चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल बेड्या ठोकल्या आहेत.
सिनेस्टाईल पाठलाग करीत अटक
शुक्रवारी भुसावळ येथून स्वीफ्टमधून विविध कॅनमध्ये सुमारे चारशे लिटर डिझेल चोरी करीत भामटे मुक्ताईनगरच्या दिशेने निघाल्याची माहिती मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीरक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचार्यांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. संशयीत मध्यप्रदेशातील असल्याने ते मुक्ताईनगरमार्गे मध्यप्रदेशातील जाणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मुक्ताई चौकात कर्तव्यावर असलेले जवान सोपान वंजारी यांना माहिती कळवण्यात आली. त्यांनी तत्काळ मुक्ताईनगर पोलीस स्थानकात हायवे आणि समांतर रस्त्यावरील मुक्ताई चौकाकडे पाठविले.

तीन्ही संशयीत तालुका पोलिसांच्या ताब्यात
सोपान वंजारी यांनी प्रसंगावधान राखून तेथून जाणारा एक ट्रक हा रस्त्यावर आडवा लावला. यात अपेक्षेनुसार संबंधीत स्वीफ्ट गाडातील चोरटे हे समांतर रस्त्यावरून वेगाने मुक्ताई चौकात आले. येथे अचानक समोर आडवा लावलेला ट्रक पाहून त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही. आणि त्यांची स्वीफ्ट कार ही आडव्या लावलेल्या ट्रकला आदळून थांबली. यावेळी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. डिझेल चोरीचा गुन्हा हा भुसावळ तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे यातील तिन्ही संशयितांना भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




