भुसावळातील पत्रकार-छायाचित्रकारांनी घडवले माणुसकीचे दर्शन
कुटुंबापासून दुरावलेल्या महिलेची कुटुंबासोबत घडवली भेट
भुसावळ : कोरोना व्हायरससारख्या परीस्थितीतही पत्रकार आपली भूमिका नेटाने निभावत असून समाजापर्यंत इत्यंभूत बातमी पोहोचवत आहेत. केवळ वृत्तसंकलन व फोटोग्राफी करणे एव्हढाच हेतू मनात न बाळगता ‘लोकमत’ वृत्तपत्राचे छायाचित्रकार श्याम गोविंदा, पत्रकार इम्तियाज अहमद व मंगेश जोशी या तिघांच्या प्रयत्नांनी गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका वृद्ध महिलेला आपल्या कुटुंबासोबत भेट करून देत माणुसकी जोपासली.
वृद्ध महिलेने मानले आभार
निजामपूर, जि.धुळे येथील 70 वर्षीय वृध्द महिला रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले या गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त होत भटकत होत्या. पत्रकारांनी प्रयत्न केल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकाचा शोध लागल्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक त्यांना घेण्यासाठी मंगळवारी भुसावळ येथे आले होते. नगरपालिका रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून छायाचित्रकार श्याम गोविंदा, मंगेश जोशी, इम्तियाज अहमद यांनी या वृद्ध महिलेला जिल्हा सीमेवर त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. कुटुंबापासून दुरावलेल्या वृद्ध महिलेला कुटुंब मिळाल्यानंतर तिने भुसावळातील पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानत त्यांना आशीर्वादही दिले. दरम्यान, केवळ बातमी व छायाचित्र नागरीकांपर्यंत पोहोचवणे ही जवाबदारी न समाजात समाजाचेही आपण देणं लागतो या भावनेतून भुसावळातील पत्रकारांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


