यावलमध्ये ‘अतिक्रमण हटवा’चा आदेश अन् ‘मुदतवाढी’चा डाव ! सत्ताधार्यांवर विरोधकांचा निशाणा
यावल (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : यावल नगरपालिकेच्या वतीने शहरातील राष्ट्रीय महामार्ग व विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी सत्ताधारी नगराध्यक्षांनीच नोटीसा दिल्या आणि नंतर मुदत वाढीसाठी तेच पुढे आले, केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हा संपूर्ण प्रकार करून त्यांनी नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप नगरपालिका विरोधी गटासह महायुतीच्या पदाधिकार्यांनी शेतकी संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
विरोधी गटाला विश्वासात न घेता सत्ताधार्यांचा डाव
महायुतीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहिती नुसार, यावल नगर पालिकेच्या वतीने 7 सप्टेंबर रोजी अतिक्रमण काढले जाईल, अशा स्वरूपाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. मंगळवार, 8 तारखेला अतिक्रमण काढायचे आहे म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. या नोटीसीवर नगराध्यक्षा छाया पाटील, उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब आणि मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची नावे आहे. दुसरीकडे नागरिकांमध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी हे अतिक्रमण काढत असल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार नगरपालिकेकडे नव्हते, एकूणच नगरपालिका हे त्यांच्या स्तरावर हे अतिक्रमण काढणार असून त्यासाठी त्यांनी नोटीस काढण्यात आली, असा दावा यावेळी करण्यात आली.

अतिक्रमण हटवण्यापूर्वी सण-उत्सव असल्याचे माहित नव्हते काय?
सत्ताधारी गटाने अतिक्रमण काढण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध केली व नंतर त्यांनीच यात प्रामुख्याने नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील यांनी तहसीलदार व पोलिसांकडे जाऊन मुदतवाढ मिळाली, असे सांगितले. वास्तविक मुदतवाढ दिली कोणी ? हे कोणी स्पष्ट सांगत नाहीये, वास्तविक नगरपालिकेकडूनच ही मुदतवाढ मिळाली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीला या संदर्भात काहीच माहित नाही. सत्ताधारी गटाने नगरपालिकेच्या विरोधी गटाला विश्वासात न घेता हा संपूर्ण डाव खेळला. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. जर सण होते तर ही नोटीस काढताना तुम्हाला कळले नाही का ? अशा शब्दात विरोधी गटाने सत्ताधार्यांवर हल्लाबोल केला. अतिक्रमण करणारे तुम्हीच व मुदतवाढ देणारे तुम्हीच, असा दावा यावेळी करण्यात आला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा शहराध्यक्ष आकाश चोपडे, जिल्हा पदाधिकारी जुगल पाटील, नगरपालिकेच्या भाजपाच्या गटनेता नंदा महाजन, नगरसेविका सविता नन्नवरे, शुभांगी येवले, कल्पना वाणी यांची उपस्थिती होती.
प्रसिद्धीसाठी स्टंटबाजीची आवश्यकता नाही : नगराध्यक्षा
नगराध्यक्षा छाया अतुल पाटील म्हणाल्या की, पोलीस प्रशासनाने पालिकेला अतिक्रमण काढण्याची सूचना केली असून त्यांचा अतिक्रमण काढण्यासाठी आग्रह आहे. नगरपालिकेने वृत्तपत्राद्वारे नोटीसीची प्रसिद्धी दिली व या नोटीसीवर नगराध्यक्षांचे नाव पालिकेने टाकले. खरे तर नगरपालिकेच्या जाहिरातीत प्रोटोकॉल म्हणून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची नावे असतात, असेही नगराध्यक्षा म्हणाल्या. माझ्यासह कुटूंब बाहेरगावी असल्याने 6 रोजी आल्यानंतर व नागरिकांचे फोन आल्यानंतर हा प्रकार कळाला. संपूर्ण यावल शहर आमच्या पाठीशी असून 30 वर्षांपासून राजकारणात असल्याने आम्हाला पस्टंटबाजी करण्याची आवश्यकता नाही, असेही नगराध्यक्षा म्हणाल्या.

