धुळ्यातील 12 हजारांचे लाच प्रकरण : बाळापूर तलाठ्याला अटक ; तिघा संशयीतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
वरिष्ठ एसीबीच्या रडारवर : मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता ?
धुळे (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : गौण खनिज वाहतूक करू देण्यासह गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 12 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मोहाडी, ता.धुळे येथील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे (40) व खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी (31) यांना धुळे एसीबीने धुळे तहसील आवारातून अटक केली होती. या प्रकरणात सहभाग आढळलेला ग्राममहसूल अधिकारी तथा बाळापूर तलाठी मृणाल शरद नगराळे हा अटकेच्या भीतीने सुरूवातीला पसार झाला होता मात्र पथक पोहोचण्यापूर्वीच तो बुधवारी सकाळी एसीबीकडे सरेंडर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटकेतील तीन्ही आरोपींना धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
बांधकाम मटेरीयलची वहातूक करणार्या व्यावसायीकाच्या हायवा वाहन चालकाला गुन्हा दाखल न करण्यासह वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी 20 हजारांची लाच आरोपींनी मागून जागेवर आठ हजार रुपये स्वीकारले होते. तक्रारदाराने उर्वरीत 12 हजारांच्या लाच मागणीची धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी दुपारी धुळे तहसील आवारात सापळा रचण्यात आला. संशयीत जयेश चौधरीने लाचेची रक्कम स्वीकारत तलाठी दाभाडे यांच्याकडे दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली तर संशयीत शरद नगराळे कुणकुण लागताच पसार झाला मात्र बुधवारी तो स्वतःच एसीबीला शरण आला.

वरिष्ठांची होणार चौकशी : कारवाईची दाट शक्यता
महसूल विभागात झालेल्या लाचेच्या सापळ्यानंतर वरिष्ठांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अटकेतील तीन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या लाच प्रकरणात आणखी मोठी कारवाई होणार असल्याची धुळे एसीबीच्या सूत्रांची माहिती आहे. संशयीत पोलीस कोठडीत कुणा-कुणाची नावे सांगतात? लाच प्रकरणात नेमका आणखी कुणा बड्याचा सहभाग आहे ? हे लवकरच स्पष्ट होणार असून कारवाईकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

