भुसावळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतेच्या मुलभूत सुविधांच्या अभावाने घटले मतदान


भुसावळ (4 डिसेंबर 2025) : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी मतदान प्रक्रिया झाली. शहरात 55 टक्के अल्प मतदान झाले मात्र गेल्या 2016 च्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का 3.42 टक्यांनी कमी झाला. पालिका प्रशासनाकडून मुलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत, पाणीपुरवठा, सार्वजिनक स्वच्छता, पथदिवे या मुलभुत सुविधांपासूनही भुसावळकर वंचित असल्याने निवडणुकीत मतदारांची उदासिनता समोर आली.

उच्चभ्रू भागातही अल्प मतदान
शहरातील उत्तर भागातील शांतीनगर, तापीनगर या उच्चभ्रू वस्त्यांमध्येही मतदान 50 टक्यांवर गेले नाही. 2019 व 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तसेच गेल्या सन 2016 च्या सार्वजनिक ज्या मुस्लिम बहुल भागातील प्रभाग 12, 13, 16, 17, 18, 19 च्या बुथवर मतदारांच्या उशिरापर्यंत मतदानाासाठी रांगा लागत होत्या. मात्र यंदा या प्रभागांमध्येही 50 टक्यांपेक्षा अधिक मतदान झाले नाही.



उच्चभू्र भागातही टक्का घसरला
डी.एल. हिंदी स्कूलच्या प्रभाग 13/4 बुथवर अवघे 38 टक्के तर प्रभाग 18/1 च्या बुथवर 37.30 टक्के मतदान झाले. या सोबतच शांतीनगर, तापीनगर या सारख्या भागातील मतदान केंद्रांवरही सरासरी 53 टक्यांच्या वर मतदान झाले नाही. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत ते 3 टक्यांनी कमी आहे.

या केंद्रांवर अधिक मतदान
शहरातील गाडगेबाबा विद्यालय 12/3 या बुथवर 78.3, नगरपालिका शाळा क्रमांक 35 च्या 22 /4 केंद्रांवर 74.95, आदर्श हायस्कूलच्या केंद्रांवरील तीन बुथवर 73 ते 78 टक्के मतदान झाले. यासोबतच भुसावळ हायस्कूलच्या 9 /1 बुधवार 71.86 तर व 9 /2 या केंद्रांवर 77.43 टक्के मतदान झाले.

विरोधक, सत्ताधारी एका माळेचे मणी
शहरात गेल्या काळात पायाभुत विकास तर दुरच पण प्राथमिक सेवा सुविधांचाही विकास झाला नाही. गत सत्ताधार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांची पूूर्तता केली नाही तर विरोधकांनी प्रखरपणे आंदोलन करून किंवा सभागृहातून विकासाचे मुद्दे मांडले नाहीत. एकंदरीत निवडणुकीनंतर जनता वार्‍यावर सोडली जाते, विरोधक असो किंवा सत्ताधारी दोन्ही एका माळेचे मणी, असे बोलून मतदार राजकारण्यांच्या नावाने खडे फोडत असल्याचे दिसून आले.

गालबोट लागले नाही
पालिकेच्या या निवडणुकीत सर्व पक्षीयांनी मात्र निवडणुकीला गालबोट लागू दिले नाही. सर्वच पक्ष व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत संयम बाळगला. शहरात सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या प्रचारात गुन्हेगारी व गुंडगिरीचा मुद्दा रंगवला होता. निवडणुकीच्या निकालानंतरही शहरातील सार्वजनिक शांततेला गालबोट लागणार नाही, याची दक्षताही घेतली जावी, अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !