चाळीसगावातील लाचखोर अभियंत्यासह सहाय्यक पोलिस कोठडीत

सात हजारांचे लाच प्रकरण : लाच प्रकरणाचा तपास धुळे एसीबीकडे


Corrupt engineer and assistant from Chalisgaon remanded to police custody चाळीसगाव (8 जुलै 2026) : रस्ता कामाचे बिल काढून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगावातील वर्ग एकचा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे व जि.प.चा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कुलदीप गमे यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच अटक केली होती. लाचखोर अधिकार्‍यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे सार्वजनिक बांधकामाशी संबंधित कंत्राटदार असून त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गाव हाळचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे मोजमाप होवून मोजमाप पुस्तिकेत नोंदी व मूल्यांकन होवून एकूण 10 लाख 47 हजार 843 रुपयांचे बिल अदा करण्यासाठी व अभियंता निनावे यांच्याकडे पाठवण्यात आले होते. तक्रारदाराने बिलासाठी निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकूण बिलाच्या एक टक्केप्रमाणे 10 हजार 500 रुपयांची लाच मागितली व धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात निनावे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सात हजारात तडजोड केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी गमे याने कार्यालयातच लाच स्वीकारताच सुरूवातीला त्याला व नंतर निनावे यास अटक करण्यात आली.

तपास धुळे एसीबीकडे
आरोपींना धुळे एसीबीने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !