नाथाभाऊंचे ठरलेय : भाजपात जाणार का ?


गणेश वाघ
भुसावळ (9 जुलै 2026) : राष्ट्रवादीचे हेवीवेट व ओबीसी प्रभावी नेते व आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात स्वगृही पतरण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यास निमित्त ठरलेय ते विनोद तावडे यांनी घेतलेल्या भेटीनिमित्ताने.

सहा वर्ष राष्ट्रवादीत मात्र सातत्याने भाजपा प्रवेशाच्या वावड्या
आमदार एकनाथराव खडसे यांच्या अंगलट भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण आल्यानंतर त्यांना 2016 मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. व त्यानंतरच्या 2019 मध्ये आलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ असूनही त्यांना पक्षाने तिकीट नाकारत कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसेंना तिकीट दिले मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. पक्षात असूनही खडसेंना कुठलीही जवाबदारी देण्यात आली नाही फडणवीस, महाजनांमुळेच तिकीट कापल्याचा दावा त्यावेळी त्यांनी केला शिवाय त्यानंतरही आरोपांचा ससेमिरा कायम राहिल्याने व सततची होत असलेली कोंडी पाहता तसेच तसेच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे 21 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला ‘रामराम’ ठोकून आमदार खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांनी खडसेंना विधान परिषदेवर संधीही दिली मात्र त्यानंतरही खडसे भाजपात येणार असल्याच्या वावड्या कायम सुरूच राहिल्या.

भाजपात प्रवेशाचा फोटो समोर आलाच नाही !
ओबीसी समाजाचे प्रभावी नेते व उत्तर महाराष्ट्रात पक्षाची मजबूत संघटना उभी करण्यात योगदान असलेल्या व सलग अनेक वर्षे आमदार, विरोधी पक्षनेते आणि तब्बल 12 खात्यांचे मंत्रीपद सांभाळणार्‍या खडसेंनी काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती तर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला मात्र त्याचा फोटो समोर आला नसल्याची चर्चाही रंगली. अर्थात या बाबीला ना पक्षाने दुजोरा दिला ना खडसेंनी अधिकृत दुजोरा दिला ! खडसेंचा प्रवेश रखडण्यामागे त्यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता व त्यावेळी तो प्रवेश रखडल्याची चर्चाही होताना दिसून आली.

विनोद तावडेंची ती भेट अन् पुन्हा भाजपा प्रवेशाच्या चर्चा
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मुंबईतील निवासस्थानी आमदार खडसेंची भेट घेतली व फोटो सोशल मिडीयावर झळकला व त्यानंतर खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 2 सप्टेंबरला आमदार खडसेंचा वाढदिवस असून या निमित्ताने भव्य सोहळा मुक्ताईनगरात होत असून या सोहळ्यात खडसे भाजपाची होण्याची चर्चा आहे.

केंद्रीय नेतृत्व सकारात्मक !
जिल्ह्यातील नेत्यांशी खडसेंचे मतभेद सर्वांनाच ठाऊक आहे मात्र केंद्रात खडसेंच्या शब्दाला आजही तितकेच वजन आहे हे नाकारून चालणार नाही. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या तावडे यांच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांचा भाजपमधील प्रभाव कमी करण्यासह आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाला पुन्हा पक्षात परत आणण्याबाबत केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याची चर्चा या भेटीनंतर अधिक रंगू लागली आहे.

आमदार खडसे स्वगृही परतणार का? स्पष्टच केला खुलासा
विनोद तावडेंच्या भेटीबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. विनोद तावडे हे सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी मीदेखील उपस्थित असल्याने त्यांनी आपलीही सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली आणि काही काळ वैयक्तिक विषयांवर चर्चा झाली. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांसह शरद पवार येणार मुक्ताईनगरात
आमदार खडसेंच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हरिभाऊ बागडे आदींसह अनेक बडे पदाधिकारी मुक्ताईनगरात येण्याची शक्यता आहे. या सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !