भुसावळात चाकू व पिस्टलाचा धाक दाखवून तरुणांकडील 11 हजार रुपये लूटले
वरणगावसह भुसावळातील संशयीत जाळ्यात : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
11,000 rupees were looted from the youth by showing the threat of knife and pistol in Bhusawal भुसावळ (9 जुलै 2026) : चाकू व पिस्टलाचा धाक दाखवून कंडारीतील युवकासह दोघांना शहरात मारहाण करीत लुटण्यात आल्याची घटना खडका चौफुलीजवळील ब्रिजवर 8 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
असे आहे लूट प्रकरण
तक्रारदार गणेश दीपक तगडे (25 रा.कंडारी महादेव टेकडी, भुसावळ) हे जळगाव येथील मंगेश जोहरे यांच्याकडे कन्स्ट्रक्शन कामावर सुपरवायझर असून त्यांच्यासोचत गावातीलच राकेश गणेश सोनवणे हा देखील मजुरीचे काम करतात. बुधवार, 8 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास गणेश आणि राकेश हे दोघे जळगावहून मुक्ताईनगर येथे कामानिमित्त दुचाकीवरुन जात असताना ते भुसावळच्या खडका चौफुली जवळील ब्रीजजवळ आल्यानंतर एका दुचाकीवर (क्रमांक 4202) व दुसर्या बर्गमॅन मोपेडवर (क्रमांक 4333) चार अनोळखी तरुण आल्यानंतर त्यांनी रस्त्यात दुचाकी आडव्या लावून गणेश व राकेशला मारहाण सुरू केली. नंतर पिस्तूल च चाकूच्या धाकावर दोन्हींकडील 11 हजार रुपये हिसकावून पोबारा केला.

गुन्हा दाखल होताच दोघांना अटक
गणेश तायडे यांनी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर केशव सुनील भालेराव (23, सिद्धेश्वर नगर, वरणगाव) व खुशाल शिवदास रुम (20, गडकरी नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.