आदर्श ग्रामपंचायत फुलगावच्या सरपंच व सदस्याविरोधात खंडणीचा गुन्हा : कारण वाचून बसेल धक्का
Extortion case registered against two individuals, including the Sarpanch and members of the model Gram Panchayat, Phulgaon भुसावळ (9 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून गौरवण्यात आलेल्या फुलगावातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अपंग निधीचा धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी दहा टक्के कमिशन मागितल्याने हा गुन्हा वरणगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. लोकनियुक्त सरपंच शाम सुरेश फुलगावकर व सदस्य सचिन शशिकांत पाटील (दोन्ही रा.फुलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
असे आहे खंडणी प्रकरण
महेंद्र काशीनाथ पाटील हे फुलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. 6 जुलै रोजी गावातील काही अपंग लाभार्थी त्यांना ग्रामपंचायत निधीतून मिळणार्या पाच टक्के अपंग निधी दोन वर्षांपासून का मिळाला नाही ? याची विचारणा करण्यासाठी आल्यानंतर पाटील यांनी 7 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत गाठली. यावेळी लोकनियुक्त सरपंच शाम सुरेश फुलगावकर व सदस्य सचिन शशिकांत पाटील यांनी तुम्हाला अपंग निधीचा धनादेश काढून देतो मात्र त्यासाठी 10 टक्के कॅश लागेल. या गोष्टीला तक्रारदाराने विरोध केल्यानंतर संबंधितांनी भुसावळातील मुले आणून ठार मारण्याची धमकी दिली तसेच फेसबुकवर टाकलेले संभाषण डिलीट करण्याची मागणी केल्याचा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सरपंच व सदस्यांविरोधात खंडणीचा गुन्हा वरणगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.
