जळगावातील तरुणाचा खून : मारेकरी नंदुरबार कारागृहात


Young man murdered in Jalgaon: The killer is in Nandurbar jail. यावल (13 डिसेंबर 2025) : शहरातून बोरावल जाणार्‍या रस्त्यावर पाटचारी जवळ जळगावच्या समता नगरातील 19 वर्षीय तरुणाला जळगाव येथीलच तरुणांनी अडवून इंस्टाग्रामच्या सोशल नेटवर टाकलेल्या व्हिडिओच्या रागातून मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच संशयीतांविरूध्द अ‍ॅट्रासिटीचे कलम वाढवल्यानंतर त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली व शुक्रवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व संशयीताना नंदुरबार कारागृहात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

असे आहे खून प्रकरण
इंस्टाग्राम या सोशल नेटवर्कवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून तुषार चंद्रकांत तायडे (19, रा.बौध्द वाडा, समता नगर, जळगाव) या तरुणाला यावल ते बोरावल रस्त्याने तो जळगाव जात असताना मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी अडवून मारहाण करण्यात आली व गंभीर जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले. जळगाव येथे मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला. बुधवारी या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत विक्रम पंडितराव सोनवणे (46), अविनाश उर्फ अविनाथ सुकलाल सोनवणे (22), विजय रुपचंद सोनवणे (27, तिघे राहणार सुजदे, ता.जि.जळगाव), निलेश पंडित कोळी (33, रा.बोरनार, ता.जि.जळगाव) व कल्पेश निलेश इंगळे (21, रा.आसोदा, ता.जि.जळगाव) या पाच जणांना यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेेच्या पथकाच्या मदतीने अटक केली. या सर्व पाच जणांना प्रारंभी यावल येथील न्यायालयाने सहा दिवसाची 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.



संशयीतांना 14 दिवसांची कोठडी
या गुन्ह्यामध्ये अ‍ॅट्रासिटीचे कलम वाढवण्यात आले आणि तपास हा डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर संशयीतांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा भुसावळ येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नंदुरबार कारागृहात ठेवण्याचे आदेश
या गुन्ह्यातील अटकेतील सर्व पाच संशयीत हे जळगाव तालुक्यातीलच आहे व त्यांनी केलेल्या या गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेता भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र विशेष न्यायालयाने या सर्वांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करतांना त्यांना भुसावळ व जळगाव येथील कारागृहात न ठेवता थेट नंदुरबार कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !