हतनूरच्या आवर्तनाने पाणीप्रश्न मिटला : भुसावळात रोटेशन रोस्टर पूर्ववत होण्यासासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार
रविवारी पालिकेच्या बंधार्यात पाणी पोहोचताच सुरू झाली उचल ः
Water supply issue resolved following Hatnur release ; two days needed to restore rotation roster in Bhusawal भुसावळ (29 जून 2026) : तीन दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाणार्या भुसावळकरांना रविवारी अखेर दिलासा मिळाला. बुधवारी हातनूर धरणातून सोडण्यात आलेले आवर्तनाचे पाणी रविवारी सकाळी रेल्वे प्रशासनाचा पाणीपुरवठा यंत्रणेतील बंधारा भरल्यानंतर भुसावळ नगर परिषदेच्या बंधार्यातील जॅकवेल जवळ पोहोचले. जॅकवेल जवळ मुबलक पाणी साचल्यानंतर नगरपरिषद पाणीपुरवठा यंत्रणेने दुपारी पाणी उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
दुपारी उचल, सायंकाळी नळाला पाणी
जॅकवेलजवळ पुरेसे पाणी आल्यानंतर दुपारी पंपिंग सुरू करून पाणी शुद्धीकरण केंद्राकडे पाठवण्यात आले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील जुना सातारा परिसरातील खळवाडी, काशीराम नगर, आराधना कॉलनी व वेडी माता नगर या भागात पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास महात्मा फुले नगर व भारत नगर या परिसरात नळाद्वारे पाणी सोडण्यात आले. या दोन्ही भागांचा रोस्टर गुरुवारी होता. मात्र आवर्तन उशिरा आल्याने तब्बल तीन दिवस विलंबाने रविवारी उशिरा नागरिकांना पाणी मिळाले.


रोस्टर पूर्ववत होण्यास दोन दिवस
शहराची पाण्याची विखुरलेली साखळी पूर्वीच्या रोस्टरप्रमाणे सुरळीत होण्यासाठी अजूनही दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जॅकवेलजवळ पाणी आले असले तरी संपूर्ण शहराला एकाच वेळी पाणी देणे शक्य नाही. वितरण यंत्रणेचा दाब, जलकुंभ भरणे व जुन्या पाईपलाईनमुळे टप्प्याटप्प्याने पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारपर्यंत सर्व भागांचा पुरवठा नियमित रोस्टरप्रमाणे होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेचा बंधारा भरल्यानंतर पालिकेला पाणी
दीपनगर औष्णिक वीज केंद्र व मध्य रेल्वेचा बंधारा आधी भरल्यानंतरच पालिकेच्या बंधार्यात पाणी येते. रविवारी सकाळी रेल्वेचा बंधारा तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाल्यावर पालिकेच्या बंधार्याकडे पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे बुधवारी निघालेले आवर्तन पाच दिवसांनी भुसावळच्या जॅकवेलपर्यंत पोहोचले.
नागरिकांची पाण्यासाठी धावपळ संपली
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील अनेक भागांत पाणी नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागले होते. रविवारी सायंकाळी नळाला पाणी आल्याने महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. खळवाडी व काशीराम नगर परिसरात सायंकाळी सहा वाजता पाणी येताच नागरिकांनी भांडी घेऊन धाव घेतली. महात्मा फुले नगरमध्ये रात्री 11 वाजता पाणी आल्याने उशिरापर्यंत नागरिक जागे होते.
पुढील नियोजन गरजेचे
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी भुसावळला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही हातनूरचे आवर्तन उशिरा सुटले व वाटेत दीपनगर व रेल्वेने आधी पाणी घेतले. त्यामुळे शहराचा रोस्टर कोलमडला. यापुढे पाटबंधारे विभागाने आवर्तन लवकर सोडावे व भुसावळसाठी राखीव पाणी ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिका प्रशासनानेही दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
