पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाला अधिकारीच जवाबदार : अजित पवार


Officials are responsible for the land deal case in Pune: Ajit Pawar मुंबई (13 डिसेंबर 2025) : पुण्यातील कोरेगाव पार्क (मुंढवा) परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे अडचणीत आलेल्या पार्थ पवार अडचणीत आले असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमीन व्यवहाराचे खापर अधिकार्‍यांवर फोडले आहे. व्यवहार सुरू असताना संबंधित अधिकार्‍यांनी कागदपत्रांची सखोल तपासणी करणे अपेक्षित होते. जर त्या टप्प्यावरच काही त्रृटी आढळल्या असत्या आणि त्यावर तातडीने कारवाई झाली असती तर पुढील गैरप्रकार घडले नसते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर त्यांनी थेट अधिकार्‍यांवर फोडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

तर हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी का ?
शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाशी संबंधित एक महत्त्वाचं विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी निगडित काही तक्रारींची सुनावणी आता थेट मंत्र्यांकडे केली जाणार आहे. अशा प्रकरणांना थेट न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही मात्र या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी थेट सवाल उपस्थित केला की, अमेडिया कंपनीशी संबंधित प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच सरकारने हे विधेयक आणले आहे का? या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी कोणाच्याही संरक्षणासाठी हे विधेयक आणलेले नसल्याचे स्पष्ट करत आपल्या भूमिकेचा ठामपणे पुनरुच्चार केला.



व्यवहार रद्द करण्यात आल्याची घोषणा
पुण्यातील मुंढवा परिसरातील सुमारे 1800 कोटी रुपयांच्या किंमतीच्या जमिनीचा व्यवहार चर्चेत आला होता. आरोप असा करण्यात आला की, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केली आणि स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रुपयांचा भरणा करण्यात आला. उद्योग संचालनालयाकडून अवघ्या 48 तासांत या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली होती आणि संपूर्ण प्रक्रिया केवळ 27 दिवसांत पूर्ण झाल्याचे समोर आले होते. ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी स्वतः पुढे येत हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.

शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न
या जमिनीवरील पॉवर ऑफ टर्नी शीतल तेजवानी यांच्या नावावर होती. पोलिस तपासात असे समोर आले की, त्यांनी या अधिकारपत्राचा गैरवापर करत शासकीय जमीन खासगी कंपनीच्या नावावर हस्तांतरित केली. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते आणि चौकशीदरम्यान मूळ कागदपत्रे सादर न झाल्याने संशय अधिक बळावला. पुढील तपासात खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ टर्नी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अखेर सर्व पुरावे हाती आल्यानंतर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणात अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही थेट कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !