पोलिस अधिकार्याच्या ‘त्या’ कृतीनंतर तत्काळ झाले निलंबन : व्हिडिओ झाला व्हायरल
Police officer suspended immediately after ‘that’ action: Video goes viral पुणे (2 जुलै 2026) : पुण्यातील एक पोलीस अधिकार्याला दबंगगिरी करणे चांगलेच महागात पडले आहे. कॅफेत केलेल्या तोडफोडनंतर या अधिकार्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. संदीप कदम असे निलंबित अधिकार्याचे नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक आहेत.
काय आहेत प्रकरण ?
पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचार्यांशी केलेल्या गैरवर्तन व तोडफोड केल्याच्या आरोपावरून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 6 जूनच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर असताना रात्री साधारण पावणेदोन वाजेच्या सुमारास ते शिरोळे रस्ता येथील एका कॅफेमध्ये पोहोचले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, पीएसआय संदीप कदम हातात काठी घेऊन कॅफेमध्ये प्रवेश करतात. त्यांनी काउंटरपाशी जात थेट तिथे ठेवलेले कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थांवर काठी मारून ते खाली पाडले आणि सामानाचे नुकसान केले. यानंतर त्यांनी तिथे बसलेल्या ग्राहकांना ताकाळ उठून बाहेर जाण्यासाठी सांगितले, तसेच कॅफेच्या कर्मचार्यांनाही अत्यंत अभद्र आणि उद्धट भाषा वापरून दमदाटी केली. पोलिसाच्या या अचानक झालेल्या अवतारामुळे कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचारी प्रचंड घाबरले होते.
हा सर्व प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वार्यासारखा पसरला. संदीप कदम यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे, पोलीस दलाच्या शिस्तीला काळिमा फासणारे आणि विभागाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पीएसआय संदीप कदम यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
