अमळनेरातील वाडी संस्थांनला आग : कोट्यवधींचे नुकसान
संकटकाळात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन : मंदिराची प्रति पंढरपूर म्हणून ओळख
अमळनेर (2 जुलै 2026) : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रति पंढरपूर अमळनेरातील संत सखाराम महाराज वाडी संस्थानला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना बुधवार, 1 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दूरदृष्टीकोन ठेवून बोरी नदी काठाला रस्ते केल्याने अग्निशमन बंब पोहोचू शकले. अन्यथा सराफ बाजारातील निमुळत्या रस्त्यातून अग्निशमन बंब पोहचणे शक्य नव्हते.
सकाळी दिंडी मार्गस्थ : रात्री लागली आग
बुधवारी सकाळी हभप प्रसाद महाराज अमळनेरची संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आणि रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही यंत्रणेला शॉर्ट सर्किटने वाडी संस्थानातील विठ्ठल रुख्मिनी मंदिराच्या वरच्या बाजूला प्रसाद महाराजांच्या बैठक खोलीला आग लागली. मंदिर संपूर्ण लाकडी आणि दरवर्षी ऑईल पेंट लावला जात असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. तातडीने अग्निशमन दल, अमळनेर पारोळा येथील बंब, खाजगी वाहने, नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.


आधी पांडुरंग ! प्रसाद महाराज माघारी नाहीच !
शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर असून आगीत जळाले मात्र प्रसाद महाराजांची दिंडी थांबली नाही. आधी पांडुरंग महत्वाचा म्हणत महाराज माघारी फिरलेच नाहीत. स्वतःची आईचे निधन झाले होते तरी प्रसाद महाराज माघारी फिरले नव्हते पांडुरंगाच्या भक्तीपूढे सारे दुःख आणि विश्व छोटे आहे. संतांना दुःख, आनंद, मोह माया काहीच नसते.
आगाची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दलास घटनास्थळी पाठवले. ते स्वतःही दाखल झाले अग्निशमन कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यास सुरवात केली. याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून चोपडा, शिरपूर, पारोळा येथील गाड्या दाखल झाल्या तर अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावर खाजगी टँकर धारकांना आवाहन केले. आमदार अनिल पाटील यांनी आर.बी.कन्स्ट्रक्शनचे टँकर पाठविले.
ऐक्याचे घडले दर्शन
पालिकेच्या वतीने नगरसेवक अनिल महाजन, पंकज चौधरी, बाळा संदनशिव, पंकज भोई, गोपी कासार, सुरज परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकुर, नितीन निळे, विजय पाटील, संजय कौतीक पाटील, महेंद्र पाटील, शोएब शेख, अर्षद खान, हुजैफा पठान, इमरान पठान, नईम पठान, नसीब पठान, राजा पठान, फरहान शेख, आकिब पठान, रिजवान खान यासह अनेकांनी मदतकार्य केले.
प्रांधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आदींरनी घटनास्थळी येऊन नियंत्रण केले तर डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस ताफ्यासह येऊन गर्दी आटोक्यात आणली. आगीत सर्व जळाले असलेतरी वाडी संस्थानातील देव मात्र शाबूत राहिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान मंदिराचे नुकसान झाले असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असेल, अशी माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.
