अजित पवारांच्या वक्तव्यावरून अंजली दमानिया संतप्त : पार्थ काही कुकूले बाळ नाही ; हा तर सरळ-सरळ फ्रॉडच !
Anjali Damania is furious over Ajit Pawar’s statement: Parth is not some innocent child; this is a blatant fraud! मुंबई (13 डिसेंबर 2025) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन प्रकरणाचे खापर अधिकार्यांवर फोडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची तीव्र शब्दांत खिल्ली उडवत संताप व्यक्त केला. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत उपमा देत म्हटले की, लहान मुलं शाळेत असताना, म्हणजेच कुकूले बाळ असताना, त्यांच्या भांडणात शिक्षकांनी लक्ष द्यायला हवं होतं, असं आपण म्हणू शकतो पण अजित पवारांच्या वक्तव्याची तुलना त्यांनी अशाच परिस्थितीशी केली आणि थेट सवाल केला की, पार्थ पवार काही कुकूले बाळ नाहीत.
हा तर सरळ-सरळ फ्रॉडच
अंजली दमानिया म्हणाल्या की, पुण्यातील जमीन प्रकरणात जी काही कृत्ये झाली आहेत, ती साधी चूक नाही तर सरळसरळ फ्रॉड आहे. एकदा नव्हे, तर सातत्याने कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले, सप्लीमेंट एलएलपी तयार करण्यात आली, रिझोल्यूशन पास करण्यात आले, खोटा एलओआय मिळवण्यात आला, त्यानंतर अॅडज्युडिकेशन करण्यात आले, विक्री व्यवहार करण्यात आला आणि अखेर ताबाही घेण्यात आला. एखादी व्यक्ती इतक्या टप्प्यांतून हा व्यवहार पूर्ण करत असेल, तर ती चूक नसून सुनियोजित फसवणूक असल्याचे दमानिया यांनी ठामपणे नमूद केले.


सत्ता, पद किंवा वजनाच्या जोरावर पडदा टाकता येणार नाही
अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर अधिक आक्रमक होत, अधिकार्यांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न फेटाळून लावला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर एखाद्या अधिकार्यांना तुमच्या मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा. या प्रकरणात अधिकार्यांची चूक नाही, कारण जे घडलं आहे ते स्पष्टपणे दिसणारं आणि दस्तऐवजांमधून सिद्ध होणारं आहे त्यामुळे प्रशासनालाच दोष देणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की, आम्हाला जे लढायचं आहे, ते आम्ही लढणारच आहोत. सत्ता, पद किंवा वजनाच्या जोरावर अशा प्रकरणांवर पडदा टाकता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक पातळीवर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जबाबदारी अधिकार्यांवर ढकलल्याचे दिसून आले. त्यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, संबंधित व्यवहार सुरू असताना प्रशासनातील अधिकार्यांनी कागदपत्रांची योग्य पद्धतीने तपासणी करणे अपेक्षित होते. कोणतीही त्रृटी किंवा चुकीची बाब आढळून आली असती, तर त्याच वेळी अधिकार्यांनी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. अधिकार्यांकडून वेळीच कारवाई झाली असती, तर पुढील साखळी घडामोडी घडल्या नसत्या, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर थेट सरकारी अधिकार्यांवर फोडल्याचा आरोप होत आहे.







