राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्याचा ध्वजारोहण समारंभातच मृत्यू
An officer of the State Excise Department died during the flag hoisting ceremony उमरगा (26 जानेवारी 2026) : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असतानाच उमरगा येथे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले पीएसआय मोहन भीमा जाधव यांचे सोमवारी ध्वजारोहण समारंभादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. देशप्रेमाने ओथंबलेल्या वातावरणात अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
अचानक चक्कर अन झाले निधन
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने उमरगा येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पीएसआय मोहन जाधव यांच्यासह विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी गणवेशात सज्ज होऊन शिस्तबद्ध रांगेत उभे होते. कार्यक्रम सुरू असतानाच जाधव यांना अचानक चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले. जमिनीवर पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही संपूर्ण घटना तिथे सुरू असलेल्या चित्रीकरणात कैद झाली.

रुग्णालयात नेले, पण प्राण वाचू शकले नाहीत
जाधव कोसळताच सहकार्यांनी तातडीने धाव घेत त्यांना उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले मात्र त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट केले आहे.







