भुसावळातील पालिकेच्या बंधार्याची होणार डागडूजी : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन
The municipal dam in Bhusawal will be repaired : Planning underway in view of the summer season भुसावळ (29 जानेवारी 2026) : आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना टंचाईच्या झळा न बसण्यासाठी पालिकेतर्फे तापी पात्रातील बंधार्याची डागडूजी करण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या तापी बंधार्यात गेल्या काळात हतनूर धरणातून आवर्तन मिळाले मात्र बंधार्याच्या उत्तर पश्चिम व दक्षिणेकडील भागाला लागलेल्या गळतीमुळे पाण्याची नासाडी होत आहे. आगामी 3 फेब्रुवारीला होणार्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेतला जाणार आहे.
बंधार्याची पातळी घसरली
हतनूर धरणातून आवर्तन सोडून आवठडा होत नाही, तोच पून्हा बंधार्याची पातळी घसरली आहे. गळतीमुळे आगामी काळात बंधार्यामध्ये सलग 40 दिवसांचा पाणीसाठा होणे कठीण होणार आहे. आगामी उन्हाळ्यात यामुळे शहरात पाणीटंचाई किंवा पुन्हा रोटेशन वाढण्याची भीती आहे. यामुळे प्रशासनाने आगामी पालिकेच्या बैठकीतच या संदर्भात डागडूजीचा विषय हाती घेतला आहे. यामुळे डागडूजी झाली तर जलसाठा कायम राहून शहराला आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या तापी नदीतील बंधार्याला दोन्ही प्रमुख बाजू व मध्यवर्ती भागात लागलेल्या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

गेल्या दहा ते 12 वर्षांत बंधार्याच्या डागडूजीवर तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली, मात्र हा प्रश्न कायम स्वरुपी सुटला नाही. शहराला किमान 40 दिवस पुरेल इतकी बंधार्याची साठवण क्षमता आहे. मात्र पाण्याची गळती होत असल्याने ही क्षमता 30 ते 32 दिवसांवर येणार आहे. परिणामी आगामी काळात शहरात कृत्रीम टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.







