भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव
भुसावळ (10 फेब्रुवारी 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक समितीच्या वतीने मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी फॅन्सी ड्रेस, गायन व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता व आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा प्राचार्य डॉ.आर पी फालक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलतांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा संदेश
सांस्कृतिक समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी अत्यंत शिस्तबद्ध व सुयोग्य पद्धतीने केली. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक विषय, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, राष्ट्रीय प्रतीके व सांस्कृतिक परंपरा सादर केल्या. या सादरीकरणांतून सामाजिक जनजागृती व देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
गायन स्पर्धेत शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीत प्रकारातील गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सूर, ताल आणि भाव यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नृत्य स्पर्धेत शास्त्रीय, लोकनृत्य व पाश्चात्त्य नृत्य प्रकारांचे रंगतदार सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध हालचाली, भावभावना व ऊर्जा प्रेक्षकांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरल्या.
परीक्षकांनी सादरीकरण, आत्मविश्वास, सर्जनशीलता व एकूण कामगिरी या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन केले. विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. सांस्कृतिक समिती, परीक्षक, सहभागी विद्यार्थी व स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, आत्मविश्वास व एकोप्याची भावना निर्माण करणारा ठरला.






