नक्षलवादी चळवळीचा ’मास्टरमाईंड’ देवजी तिरुपती 16 माओवाद्यांसह पोलिसांना शरण !
The ‘mastermind’ of the Naxalite movement, Devji Tirupati, surrenders to the police along with 16 Maoists! नवी दिल्ली (22 फेब्रुवारी 2026) : देशातील नक्षलवादी चळवळीचा ‘मास्टरमाईंड’ समजला जाणारा माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजी उर्फ तीपिरी तिरुपतीने आपल्या16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. देवजीसह त्याचा खंदा समर्थक आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’ यानेही तेलंगणा पोलिसांसमोर गुडघे टेकले आहेत.
दंतेवाडा हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार
मे 2025 मध्ये नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्या खात्म्यानंतर देवजी नक्षल संघटनेचा महासचिव बनला होता. छत्तीसगडमधील 76 जवानांच्या बलिदानाला कारणीभूत ठरलेल्या दंतेवाडा हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. देवजी याच्यावर 1.5 कोटींचे बक्षीस होते. तर 1975 पासून चळवळीत सक्रिय असलेला संग्राम ओडिशा राज्याचा सचिव होता. संग्रामवर एक कोटींचे बक्षीस होते. या दोघांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटना नेतृत्वहीन होण्याच्या मार्गावर आहे.
कोण आहे ‘देवजी’?
देवजी हा तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी आहे. 64 वर्षीय देवजीने 1983 मध्ये पीपल्स वॉर ग्रुपमधून प्रवासाला सुरुवात केली. गडचिरोलीत दलम कमांडर म्हणून काम केलेल्या देवजीने गोव्यापासून केरळपर्यंत नक्षलवादाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दीड वर्षातील मोठ्या कारवायांचा परिणाम
सुरक्षा यंत्रणांनी गेल्या वर्षभरात राबवलेल्या ‘ऑपरेशन’मुळे नक्षल चळवळ पूर्णपणे बॅकफूटवर आली होती. 21 मे 2025 बसवा राजूचा छत्तीसगडमधील चकमकीत खात्मा झाला. दुसर्या क्रमांकाचा नेता भूपती याने 15 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. मिलिटरी कमांडर माडवी हिडमा हा 18 नोव्हेंबर 2025 रोजी चकमकीत ठार झाला. त्यानंतर सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी हा आत्मसमर्पण करणार अशा बातम्या येत होत्या. अखेर देवजीने आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.
‘नक्षलमुक्त भारत’ संकल्पाकडे वाटचाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर, संघटनेच्या सर्वोच्च प्रमुखांनीच शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ आता केवळ कागदावर उरण्याची चिन्हे आहेत. या नेत्यांनी आत्मसमर्पणावेळी मोठ्या प्रमाणात एके-47 आणि इंसास रायफली पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.