कुर्‍हेपानाचे येथे मध्यरात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना

परवानगी घेऊन पंचधातूचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचे आश्वासन; ग्रामस्थांचा ठिय्या, समिती स्थापन


Chhatrapati Shivaji Maharaj statue installed at midnight in Kurhepanache भुसावळ (3 मार्च 2026) : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे (पानाचे) येथे बसस्थानक परिसरात सोमवारी मध्यरात्री शिवभक्तांनी अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याने पोलीस व महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. परवानगी न घेता पुतळा बसवण्यात आल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी पुतळ्याशेजारी ठिय्या आंदोलन करत तो हटवण्यास मज्जाव केला.

काय घडले कुर्‍हेत
कुर्‍हे (पानाचे) हे भुसावळ तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने वरणगावनंतर दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकाचे मोठे गाव मानले जाते. भुसावळ-जामनेर मार्गावरील हे महत्त्वाचे ठिकाण असून, मराठा बहुल लोकसंख्या असलेल्या या गावात शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. बस स्थानक परिसरात यासाठी काही वर्षांपूर्वीच चबुतर्‍याचे बांधकामही करण्यात आले होते. मात्र पुढील कार्यवाही न झाल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री अचानक पुतळा स्थापन करण्यात आला. मंगळवारी सकाळी पुतळ्याजवळ महिलांसह असंख्य नागरिकांची गर्दी झाली. परवानगीशिवाय पुतळा बसवण्यात आल्याची वार्ता प्रशासनापर्यंत पोहोचताच सकाळी सुमारे नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पुतळा बसवण्याचे आवाहन केले व सध्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली. मात्र ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत पुतळा न हलवण्याचा निर्धार व्यक्त केला.




मंत्री सावकारे यांची धाव
आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही तातडीने भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद माजी सदस्य समाधान पवार व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीलगत नवीन चबुतरा बांधून शासनाची रीतसर परवानगी घेऊन पंचधातूचा भव्य अश्वारूढ पुतळा एक ते दोन महिन्यांत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीनेही या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र नवीन पुतळा बसवला जाईपर्यंत सध्याचा पुतळा जागेवरच ठेवण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी मान्य करण्यात आल्याने वातावरण निवळले असून शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समितीची झाली स्थापना
या निमित्ताने ग्रामस्थांच्या पुढाकारातून अकरा सदस्यीय ‘अश्वारूढ पुतळा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. श्रीकांत बरकले, किशोर रुणखेडे, अतुल पाटील, रुक्ससेन महाजन, योगेश पाटील, रमाकांत रुणखेडे, संदीप पाटील, एकनाथ धांडे, बबलू भगत, गणेश रुणखेडे, संदीप महाजन यांचा त्यात समावेश आहे. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत सर्व प्रशासकीय परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !