मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले ; दोन महिने तरी इंधनाच्या किंमती वाढणार नाहीत !
मुंबई (4 मार्च 2026) : इराण, इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे अनेक लोक परदेशात अडकले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे शिवाय तेलाची आत्तातरी काळजी करू नये. ते केंद्र सरकार करते आहे. दोन महिन्याचा स्टॉक आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी सकाळीच स्पष्ट केल्याने लगेच तेलाच्या किमती वाढतील वगैरे यात काही तथ्ये नाही. काही शेतमाल परदेशात अडकल्याचा उल्लेख येथे केला गेला. त्याबाबत आपल्याला काय करता येईल, ते केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील लोकांना माघारी आणण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार संवेदनशील आहे. अतिशय विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना मायदेशी आणले जात आहे. महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जात आहे. याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. परदेशातल्या लोकांना आणण्यासाठी आपण व्हॉट्सअॅप नंबर दिला आहे. केंद्र सरकारने दुतावासाशी संपर्क करायला सांगितले आहे. त्यानुसार आपण सर्व ते प्रयत्न करत असून, अडकलेल्या लोकांना परत आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच सध्या देशाकडे तेलाचा दोन महिन्यांचा स्टॉक असल्याने लगेच किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.



दुबईत अडकलेल्यांसाठी जेवणाची व्यवस्था
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी या काळात का करावे, काय करू नये याच्या एसओपी त्यांना दिल्यात आहेत. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्याची व्यवस्था करणार होतो मात्र, इतर राज्यांनी ही भूमिका घेतली, तर गोंधळ होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. आता केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मिहीर कोटेचा यांनी दुबई अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार पूर्णपणे या बाबीवर लक्ष ठेवून आहे. लोकांची सुरक्षितता, त्यांना परत आणणे, याच्या उपाययोजना केल्या जात आहे. सर्व लोकांना परत आणले जाईल. राज्य सरकारही त्याचा पाठपुरावा करेल. तुम्हा कोणाकडे काही मेसेज आल्यास आम्हाला कळवा. ते सुद्धा केंद्र सरकारपर्यंत पोहचवले जातील, असेही फडणवीस म्हणाले.







