माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना उन्हाळी शाळांच्या वेळेत बदल करण्याचा विसर ! : प्र.ह.दलाल यांचा दावा


भुसावळ (5 मार्च 2026) : मार्च महिना सुरू होताच तीव्र उन्हाचा त्रास सुरू झाला आहे. दरवर्षी मार्च महिन्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक हे जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करून सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत शाळेची वेळ ठेवण्याबाबत परिपत्रक काढतात. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी आपले कर्तव्य चोख बजावून प्राथमिक शाळांची वेळ बदल करणारे परिपत्रक निर्गमित केले तथापि तसाच वेळेत बदल सुचविणारे परिपत्रक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अद्यापही काढले नसल्याने त्यांना वेळापत्रक काढण्याचा विसर पडला का? असा प्रश्न भुसावळचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी उपस्थित केला आहे.

अनेकांनी वापरले अधिकार
अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकार्‍यांच्या परिपत्रकाची वाट न पाहता स्वतःच्या अधिकारात आपापल्या शाळेची वेळ बदलवून दुपार ऐवजी सकाळी बारा वाजे पर्यंत करून घेतली आहे मात्र त्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत एकसूत्रीपणा नाही. शिक्षणाधिकारी कामाच्या व्यापात वेळेबाबत परिपत्रक काढायला कदाचित विसरले की काय ? अशी शंकाही अनेक शिक्षक,मुख्याध्यापकांनी बोलून दाखवली.




तीव्र उन्हाचा त्रास होऊन लहान मुला मुलींचे आरोग्य बिघडू नये ऐन परीक्षेच्या कालावधीत ते आजारी पडू नये म्हणून शासनाने मान्य केलेल्या तत्वानुसार शाळांच्या वेळेत बदल सुचविणारे परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी त्वरित काढून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना अवगत करावे अशी मागणी शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते प्र. ह.दलाल यांनी एका पत्रकान्वये केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !