राज्यातील शेतकर्यांना सरकारचा मोठा दिलासा : कर्जमाफी योजना जाहीर !
Government’s big relief to farmers in the state: Loan waiver scheme announced! मुंबई (6 मार्च 2026) : राज्यातील शेतकर्यांसाठी फडणवीस सरकारने अखेर कर्जमाफी योजना जाहीर केली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकर्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली.
सरकारने पाळले आश्वासन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील शेतकर्यांसाठी कर्जमाफी राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठित केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणार्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे.


नियमित कर्ज फेड करणार्यांना दिलासा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड केली असल्यास अशा पात्र शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसितील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहे.
कृषी संलग्न केंद्र आणि ग्रामीण विकास
कृषी संलग्न केंद्र आणि ग्रामीण विकास या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. बळीराजाला केंद्रस्थानी ठेऊन शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 10-15 पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करण्यात येईल. शेतकर्यांना सुलभतेने सेवा देण्यासाठी महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकर्यांना एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.







