यावलला जलशुद्धीकरण केंद्राची नगराध्यक्षांकडून पाहणी : 30 टक्के काम पूर्णत्वाकडे
Mayor inspects Yavalla Water Purification Center: 30 percent work nearing completion यावल (7 मार्च 2026) : यावल शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी महत्वकाक्षी योजना ही शेळगाव बॅरेज पाणी पुरवठा योजना असून या योजनेचे 30 टक्के काम पुर्णत्वास आले आहे. शहरातील बोरावल रस्त्यावर सध्या जलशुध्दी करण केंद्र उभारणीचे काम सुरू झाले आहे. या कामाची बुधवारी नगराध्यक्ष छाया पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांच्या वतीने पाहणी करण्यात आली आहेे.
अंदाजपत्रकात सुधारणा
56 कोटीचे सदर काम असून यातील जलवाहिकासह जलशुध्दीकरण केंद्र असे काम प्रगतीत आहे तर पाणी उचलण्याच्या कामासाठी रस्त्याची अडचण सोडवण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रकात सुधारणा करून सुप्रमासाठी प्रस्ताव पाठवण्याची सुचना प्रसंगी नगराध्यक्षांनी केली. शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी गतपंचवार्षिकमध्ये सीडीपी योजनेला मंजुरी मिळवली होती व सुरुवातीला केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून शेळगाव बॅरेज वरून पाणीपुरवठा चा प्रस्ताव सादर केला होती मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. आता महानगरोथ्थान योजनेतून शेळगाव बँरेज पाणी पुरवठा योजनेसाठी 56 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.


कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी
शहरास सक्षम पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोणातून हे काम सुरू झाले आहे. बुधवारी या कामाची पाहणी नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील यांनी केली. त्यांना हे काम कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांनी दिली. या योजनेतील 30 टक्के काम पुर्णत्वास आले असून वर्षभरात संपुर्ण काम पुर्ण होत शहरातील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
2054 ची लोकसंख्या लक्षात घेवून काम
शहरातील 2054 ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून सदर पाणीपुरवठा योजना आखली आहे. यावल शहर ग्रामीण भागात गणले जाते. पूर्वी दरडोई 70 लीटर पाणी लाभायचे मात्र नगरपरिषदेने भुयारी गटार योजनेचे सीडीपी मध्ये समावेश केल्याने प्रती व्यक्ती दरडोई 135 लीटर पाणी नागरिकांना मिळेल व पुढील 30 वर्षासाठी शहराचा पाण्याचा प्रश्न सुटत शाश्वत पाणीपुरवठा नागरिकांना लाभेल.
असे होणार जलकुंभ
या योजनेच्या माध्यमातून 20 लाख लिटरच्या दोन जलकुंभ तसेच दहा लाख लिटरचे तीन जलकुंभ निर्माण होणे प्रस्तावित आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात, विविध वस्त्यांमध्ये जलवाहीका टाकुन नागरीकांना घरापर्यंत उच्च दाबाचा पाणीपुरवठा मिळणे अपेक्षीत आहे.
पाणी उचल जागेवर रस्ता आवश्यक
शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेत तापी नदीवरील शेळगाव बॅरेज जवळील ज्या जागेवरून पाणी उचल करायचे आहे. त्या जागेवर रस्ता आवश्वक आहे तसेच शेळगाव बॅरेजवरील पाणी उचल ठिकाणी कर्मचारीचे निवासस्थान व सुरक्षा रक्षक निवासस्थान देखील आवश्यक असून याच योजनेत त्यासाठी निधी मिळावा म्हणुन अंदाजपत्रकात सुधारणा सुचवण्यात आली व सुधारीत प्रशासकिय मान्यते करीता प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना प्रशासना केल्याचे नगराध्यक्षा छाया अतुल पाटील म्हणाल्या.







