यावल शहरात विस्तारीत भागात विविध विकासकामांचे नगराध्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
Groundbreaking ceremony of various development works in the expanded area of Yaval city in the presence of the city mayor यावल (7 मार्च 2026) : यावल शहरातील विस्तारित भागात शुक्रवारी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करीत विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिकांना भूमिपूजनाचा मान देण्यात आला. यात पूर्णवाद नगर, तिरुपती नगर व फालक नगरात रस्ते मजबुतीकरण करणे आणि गटारीचे काम केले जाणार आहे. शहरातील विस्तारीत विकासकामांना सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे.
विकासकामांमुळे समाधान
शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पूर्णवाद नगरात शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पूर्णवाद नगरातील आनंद भार्गव यांच्या घरापासून ते महेंद्र भोई यांच्या हॉटेलपर्यंत 145 मीटरचा रस्ता मजबुतीकरण करीत डांबरीकरण करणे. व 250 मीटर गटार बांधकाम करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाची भूमिपूजन नगराध्यक्ष छाया अतुल पाटील, उपनगराध्यक्ष सईदाबी मो.याकुब, नगरसेवक अतुल पाटील, सागर चौधरी, वैशाली बारी, पराग सराफ, निसार मोमीन, हकीम शेख, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख शरद कोळी यांच्या उपस्थित करण्यात आले. भूमिपूजनाचा मान स्थानिक नागरिकांना देण्यात आला.


डांबरीकरणाच्या कामालाही सुरूवात
त्याचप्रमाणे शहरातील विस्तारित भागातच तिरुपती नगरातील बिगीच्या मागील असलेला रस्ता डांबरीकरण करण्याला देखील सुरुवात करण्यात आली. तेथेदेखील भूमिपूजन पार पडले तसेच शहरातील फालक नगरातदेखील प्रभाकर चौधरी यांच्या घरासमोरील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील विस्तारित भागात याच रस्त्यांचे मजबुतीकरणाचे काम राहिलेले होते व या रस्त्यांची दुरुस्ती, गटार उभारण्याची मागणी नागरिकांची होती. या भागात काम सुरू झाल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
विस्तारित भागातील विकास कामांना प्राधान्य
शहरात भुयारी गटाचे काम केले जाणार आहे. म्हणून शहरातील रस्ते पुन्हा खोदले जातील तेव्हा शहरातील रस्त्यांचे काम हे पुढील टप्प्यात करण्याचा निर्णय सर्वानुमते नगरपालिकेने घेतला आहे. तत्पूर्वी विस्तारित भागातील रस्त्यांचे आणि गटारीच्या कामांना प्राधान्य दिले आहे. विस्तारित भागातील विकास कामे या काळात पूर्ण केले जातील तर शहरातील रस्त्यांची कामे भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर केले जाईल, असे नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी सांगितले.







