दिड लाखांची लाच घेताना महावितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
ACB arrests Mahavitaran company engineer while accepting bribe of Rs 1.5 lakh ठाणे (12 मार्च 2026) : दिड लाखांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीतील सहाय्यक अभियंत्याला एसीबीने अटक केली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे झालेल्या कारवाईने लाचखोर हादरले आहेत.
काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या चौक सेक्शन-2 कार्यालयातील सहाय्यक अभियंता योगेश ताकाजी देसाई (वय 40) यांनी ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराचा पाली बुद्रुक येथे व्यावसायीक गाळा असून त्या ठिकाणी 200 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता.




या कामासाठी आवश्यक असलेले इस्टिमेट तयार करून देण्यासाठी योगेश देसाई यांनी सुरुवातीला एक लाख 70 हजारांची लाच मागितल्याचे सांगितले जाते. तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर तडजोड होऊन एक लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने 5 मार्च 2026 रोजी रायगड-अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची 9 मार्च रोजी पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता देसाई यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 10 मार्च 2026 रोजी खालापूर येथील महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ठरलेली 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश देसाई यांना पथकाने रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड एसीबीचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस उपअधीक्षक सरीता भोसले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.