संवेदनाशून्य पंतप्रधान लाभले हे देशाचे दुर्दैव : खासदार संजय राऊत
It is unfortunate for the country to have an insensitive Prime Minister: MP Sanjay Raut मुंबई (12 मार्च 2026) : देशातील पेट्रोल, डिझेल, तेल संकटाचा तुटवडा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वक्तव्य केले नाही. हे केवळ निवडणुकीसाठी निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीतून अमाप खर्च करत आहेत. हे संवेदनशून्य पंतप्रधान आम्हाला लाभले हे देशाचे दुर्दैव असल्याची खोचक टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
भाजपाचा मंत्र म्हणाले, सिलिंडर घरपोच येईल
संजय राऊत म्हणाले की, नागरिकांनी सिलिंडर नाही म्हणून काही घाबरण्याची गरज नाही. भाजपचा जो जय श्री राम मंत्र आहे तो म्हणायचा आणि लगेच घरी सिलिंडर येतील. नमो-नमो म्हटले की सिलिंडर घरपोच येतील. पेट्रोल-डिझेलसुद्धा तुमच्या दारात येईल. इतक्या स्तरावर आपल्या देशात अंधभक्ती आहे. प्रमुख प्रश्नांची चिंता कुणाला वाटत नाही.




पंतप्रधान कुणाच्यातरी दबावाखाली
संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचे काही परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदी यांना जगामध्ये कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिलेली नाही. एकेकाळी जगामध्ये भारताच्या भूमिकेला फार महत्त्व होते, पण मोदी आल्यापासून जगात ते महत्त्व राहिले नाही. इरान युद्धाबद्दल भारताची भूमिका असायला हवी होती पण युद्धाच्या एक दिवस आधी मोदी इस्रायलला जातात आणि त्यानंतर काही तासांमध्ये इराणच्या नेत्याची हत्या केली जाते त्यावर साधा निषेध नोंदवला जात नाही. म्हणजे कुणीतरी पंतप्रधान कुणाच्यातरी दबावाखाली आहेत.
मोदींनी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ही खूप मोठी समस्या आहे असे वाटत नाही. त्यांना आसाम, केरळ, तामिळनाडूमध्ये निवडणूक जिंकणे महत्त्वाचे वाटत आहे. गॅसचा तुटवडा, हॉटेल बंद होतायत याबाबत चिंता नाही, हे बंद पडत असल्याने वाढणारी बेरोजगारी याबद्दल सरकारला काहीही चिंता नाहीच.
मुंबई सुरक्षित नाही
संजय राऊत म्हणाले की, विधीमंडळात बॉम्बची अफवा हे गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. मुंबई सुरक्षित नाही असा याचा अर्थ आहे. महाराष्ट्राचे गृहखाते, पोलिस दल हे केवळ विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे. यामुळे गुन्हेगारांचा दहशतवाद्यांना असे वाटत आहे की आपण काहीही केले तरी पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. ही केवळ अफवाच ठरावी. आमदार तिथे असताना अशा अफवा पसरू नये. संसदेवर हल्ला झाला तेव्हाही भाजप सरकार होते, ते आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे. हे दुर्दैवाने सांगावे लागत आहे.