भारतीय रेल्वेच्या 69 विभागात वक्तशीरपणात ‘भुसावळ विभाग प्रथम’
Bhusawal Division Ranks First in Punctuality Among Indian Railways’ 69 Divisions भुसावळ (15 मार्च 2026) : एरव्ही रेल्वे गाड्या उशिरा धावल्यास प्रवासी रेल्वेच्या नावाने बोटे मोडताना दिसतात मात्र भारतीय रेल्वेतील भुसावळ विभागाने वक्तशीरपणाचा निकष पाळत तब्बल 69 विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चार दिवस शंभर टक्के वेळ पालनाची नोंद घेण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने शुक्रवार, 13 रोजी भारतीय रेल्वेतील 69 विभागांमध्ये गाडी वक्तशीरपणा बाबतीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.




13 रोजी नियोजित प्रादेशिक अंतर 54 हजार 67.25 कि.मी. असून नियोजित धावण्याचा वेळ 54 हजार 74 मिनिटे होता. इंटीग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये नोंद झालेल्या 173 गाड्यांपैकी सर्व गाड्या वेळेवर धावल्याने शंभर टक्के वक्तशीरपणात परिपूर्ण विक्रम नोंदविण्यात आला.
हा आकडा दुसर्या क्रमांकावरील जोधपूर विभागाच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक असून हुबळी, राजकोट आणि भावनगर विभागांच्या एकत्रीत गाड्यांच्या (154 गाड्या) संख्येपेक्षाही जास्त आहे तसेच हा संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये एखाद्या विभागाने चालविलेल्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येतील 11वा सर्वाधिक आकडा आहे.
भुसावळ विभागाच्या इतिहासात प्रथमच विभागीय स्तरावर शंभर टक्के वक्तशीरपणात विक्रम नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीचा 98.32 टक्के वेळपालनाचा विक्रम 11 मार्च 2026 रोजी नोंदविण्यात आला होता. हा विभागासाठी ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
विभागीय तसेच झोनल स्तरावर उत्कृष्ट वक्तशीरपणा राखत भुसावळ विभागाने मध्य रेल्वेला भारतीय रेल्वेच्या 17 झोनल रेल्वेमध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च महिन्यात झोनल स्तरावर 3, 5, 11 आणि 13 मार्च या दिवशी 100% वेळपालन नोंदविण्यात आले आहे.
दररोज सरासरी 170 पेक्षा अधिक मेल/एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक असल्यामुळे गाडी संचालनाचे व्यवस्थापन अत्यंत आव्हानात्मक ठरते. जास्त गाड्या व लांब पल्ल्याच्या धावण्यामुळे कंट्रोलर्सना गाड्यांवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवण्याची जबाबदारी अधिक वाढते.
हे यश ऑपरेटिंग विभागातील सर्व कर्मचार्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साध्य झाले असून मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्यासाठी मानसिक सज्जता निर्माण करण्यात आली आहे. तसेच वक्तशीरपणात शून्य सहनशीलता धोरण अवलंबले गेले आहे.
सध्या मध्य रेल्वेने एकूण 92 टक्के वेळपालनाची नोंद केली आहे. उच्च प्रवासी वाहतूक व्यवस्थापन, विश्वासार्ह सेवा आणि वेळपालन सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. कार्यक्षम संचालन आणि उत्कृष्ट सेवा देण्याच्या ध्येयाने मध्य रेल्वे प्रवाशांना अधिक तत्पर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.